नेफ्रोप्लसच्या वतीने डायलिसिस रुग्णांसाठी लसीकरण मोहीम
मुंबई : नेफ्रोप्लस हे भारतातील सर्वांत मोठे डायलिसिस केअर नेटवर्क तसेच भारतात डायलिसिस केअरची व्याख्या नव्याने करणारी आघाडीची कंपनी डायलिसिस रुग्णांसाठी आपल्या सर्व केंद्रांवर कोविड-१९ लसीकरणाबाबत सांगण्यासाठी राष्ट्रव्यापी मोहीम आयोजित करत आहे. कोविड-१९ लसीकरणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच रुग्णांना लशीसाठी नोंदणी करण्याच्या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. लस घेण्याबद्दलचे विशिष्ट गैरसमज दूर करणे आणि लशीच्या सुरक्षितता व परिणामकारकतेबद्दल रुग्णांच्या मनातील चिंता दूर करून त्यांना लस घेण्यास प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे एकमेव उद्दिष्ट आहे.
डायलिसिस रुग्णांना कोविड-१९ विषाणूची लागण होण्याचा धोका खूप अधिक असतो, कारण निरोगी व्यक्तींच्या तुलनेत त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. ‘किडनी इंटरनॅशनल रिपोर्टस्’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या आगामी आवृत्तीत प्रसिद्ध होऊ असलेल्या ताज्या मॅन्युस्क्रिप्टनुसार, डायलिसिसवरील रुग्णांमध्ये कोविड-१९चे प्रचलन निरोगी लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे २० पट अधिक आहे. यापैकी रुग्णालयात दाखल व्हावे लागलेल्या रुग्णांपैकी सुमारे ९९ टक्के जणांना किमान १२ दिवस तेथे राहावे लागले. कोरोनाची लागण झालेल्या डायलिसिसवरील रुग्णांमध्ये मृत्यूदर २३ टक्के होता. ३० वर्षांहून कमी वयाच्या रुग्णांच्या तुलनेत ५५ वर्षांहून अधिक वयाच्या रुग्णांमध्ये मृत्यूचा दर तीन पट अधिक होता.
नेफ्रोप्लसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम वुप्पाला याबद्दल म्हणाले, “डायलिसिस रुग्ण मोठ्या प्रमाणात इम्युन-कॉम्प्रोमाइझ्ड असतात, म्हणजेच, त्यांची रोगप्रतिकारशक्ती निरोगी लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी असते. शिवाय त्यांना आठवड्यातून तिनदा डायलिसिस केंद्राला भेट द्यावी लागते. त्यामुळे कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका त्यांच्याबाबत आणखी वाढतो. याचा अर्थ डायलिसिस रुग्णांचे शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घेण्यासाठी आपल्याला खरोखर कठोर प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही नेफ्रोप्लसच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यास उत्सुक आहोत, कारण आमचे पाहुणे तसेच अन्य डायलिसिस रुग्णांमध्ये लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची, त्यांच्या शंकांचे निरसन करण्याची आणि त्यांना शक्य तेवढ्या लवकर लसीकरणासाठी नोंदणी करण्यात मदत करण्याची आमची इच्छा आहे.”
नेफ्रोप्लसच्या गेस्ट सर्व्हिसेस विभागाचे सहसंस्थापक व संचालक कमल डी शहा याबाबत म्हणतात, “या साथीच्या काळात रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे आणि डायलिसिस रुग्णांना दोन मुद्दयांमुळे संसर्गाचा धोका अधिक आहे. रुग्णालयाच्या धोकादायक वातावरणामध्ये त्यांचा नोव्हेल कोरोनाव्हायरसशी संपर्क येण्याची शक्यता अधिक असते. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांना संसर्ग झाल्यास पूर्वीपासून असलेल्या मूत्रपिंड विकारामुळे त्यांच्याबाबत उपचारांची निष्पत्ती फारशी चांगली येत नाही. म्हणूनच या रुग्णांनी जास्तीत-जास्त संख्येने लस घ्यावी या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे हे आमचे काम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, अधिक सुरक्षित भवितव्याच्या दिशेने त्यांचे आयुष्य नेणे सुलभ होईल, अशी आशा नेफ्रोप्लसला वाटते.”