उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचा राजीनामा
डेहराडून : उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता.
आता उत्तराखंडची धुरा कुणाकडे जाणार याचा सस्पेन्स कायम आहे, मात्र बुधवारी म्हणजे उद्याच भाजप (BJP) नव्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करेल असं कळतंय. उद्या भाजपची यासंदर्भात बैठकही होणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आता दुसऱ्याला मिळायला हवी, असं पक्षाचं मत आहे. मी या पदावर कधी विराजमान होईन, याचा मी विचारही केला नव्हता. मात्र भारतीय जनता पक्षाने मला ही संधी दिली. असं केवळ भाजपमध्येच होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिली आहे.
आमदार धन सिंह रावत, खासदार अनिल बलूनी आणि प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांची नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. 2000 मध्ये उत्तराखंड राज्याची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी यांच्या व्यतिरिक्त एकानेही मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही.
2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत (2017 Uttarakhand Assembly Elections) भाजपला 70 पैकी 57 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसला 11 तर अपक्षांना 2 जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांना भाजपने मुख्यमंत्री केलं. आता 2022मध्ये उत्तराखंड विधानसभेची निवडणूक होईल.
उत्तराखंडमध्ये अनिल बलूनी, अजय भट्ट आणि मंत्री धन सिंह रावत हे मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत केंद्रीय पर्यवेक्षक रमन सिंह आणि दुष्यंत गौतम देहरादूनला पोहचणार आहेत. भाजपचे शिष्ठमंडळाची बैठक झाल्यावर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राजीनामा देण्यापूर्वी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात तासापेक्षा अधिक वेळ चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर ही बैठक झाली असल्याचे समजते आहे.