राजकारण

जाहीर सभांमधून जनतेच्या पैशाचा पाण्यासारखा वापर; मायावतींचा भाजपवर निशाणा

लखनऊ : सध्या उत्तर प्रदेशात निवडणुकांपूर्वी ज्या जाहीर सभा घेतल्या जात आहे, त्या जनतेच्या पैशांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या गर्दीच्या जोरावर घेतल्या जात आहेत, असं बसपच्या सुप्रीमो मायावती म्हणाल्या. मायावती यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर निशाणा साधला. सत्तेतील लोकं सध्या जे काही करत आहेत ते सरकार आणि गरीबांच्या खजान्यातून करत आहेत. आमचा पक्ष गरीब जनतेचा पक्ष आहे. दुसऱ्या पक्षांप्रमाणे धनदांडग्यांच्या हा पक्ष नाही, असंही त्या म्हणाल्या.

उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आणि नेतेमंडळी मैदानात उतरली आहेत. परंतु चार वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या मायावती मात्र सध्या मैदानात उतरलेल्या दिसत नाहीत. मायावती इतर नेत्यांप्रमाणे अद्यापही रॅली का करत नाहीत, असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान, मायावती यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना भाजपवर टीका केली आहे.

माझे लोक जाहीर सभा आणि रॅलींचा अधिक आर्थिक बोजा उचलू शकणार नाहीत. आमचा पक्ष गरीब जनतेचा पक्ष आहे. दुसऱ्या पक्षांप्रमाणे धनदांडग्यांचा हा पक्ष नाही. आमचा पक्ष एक चळवळही आहे. जर आम्ही दुसऱ्यांचं अनुकरण केलं तर पैशांच्या अभावामुळे आम्हाला निवडणुकांमध्ये मोठं नुकसानही सोसावं लागेल. निवडणुकांच्या तयारीबाबत आमची निराळी कार्यशैली आहे, असंही मायावती म्हणाल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या रॅलीदरम्यान मायावती यांच्यावर निशाणा साधला होता. निवडणुका आल्या तरी त्या प्रचारासाठी बाहेर पडल्या नाहीत. त्या पहिल्यापासूनच पराभवाला घाबल्या आहेत, असं वाटतंय. उत्तर प्रदेशात सपा-बसपा विकास करू शकत नाहीत, असं ते म्हणाले. यावर मायावती यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button