कोरोना संकटात अमेरिकेचा मदतीचा हात; मेडिकल साहित्याची पहिली खेप भारतात दाखल
नवी दिल्ली : अमेरिकेतून २८० ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरसह मेडिकल साहित्याची पहिली खेप भारतात पोहोचली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अमेरिकेचे आभार मानले आहेत.
देशात कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. देशात दररोज कोरोनाचे तीन लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या परिस्थिती अशी आहे, की रुग्णालयांमध्ये बेडही शिल्लक नाहीत. याशिवाय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीव वाचवण्यासाठी लोकांना ऑक्सिजनही मिळत नसल्याची स्थिती आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येदरम्यान देशात ऑक्सिजनसह अनेक आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. भारतातील ही परिस्थिती पाहाता आता इतर देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज अमेरिकेतून २८० ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरसह मेडिकल साहित्याची पहिली खेप भारतात पोहोचली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अमेरिकेचे आभार मानले आणि सांगितलं की ही गोष्ट महामारीविरोधात लढा देण्यासाठीची आपली सामायिक बांधिलकी दर्शवते. ४०० हून अधिक ऑक्सिजन सिलेंडरसह एक दशलक्ष रॅपिड कोरोना व्हायरस टेस्ट कीट आणि इतर मेडिकल साहित्य घेऊन अमेरिकेच्या सैन्याचं विमान आज सकाळी नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं.
एक ट्विट शेअर करत अमेरिकन दूतावासाने वैद्यकीय उपकरणाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, या संकटाच्या काळात अमेरिकेतून कोरोनासोबत लढा देण्यासाठी गरजेचं असणाऱ्या साहित्याची पहिली खेप भारतात पाठवण्यात आली आहे. ७० वर्षांहून अधिक काळापासून आजपर्यंत अमेरिका भारतासोबत उभा आहे. आपण एकत्र मिळून या महामारीचा सामना करत आहोत.