Top Newsआरोग्य

राज्यात ५ टप्प्यांमध्ये अनलॉक; १८ जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला : वडेट्टीवार यांची घोषणा

मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये ५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. अनलॉकसाठी कोरोनाची अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन ५ टप्पे ठरवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे.. या जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात आला आहे. या १८ जिल्ह्यात आता दुकानं, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु होईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यात ५० टक्के अनलॉक असेल. महत्त्वाचं म्हणजे मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबई लॉकडाऊन शिथील होणार नाही. तसंच मुंबई लोकलबातच्या निर्णयात तूर्तास कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

अनलॉकसाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत ५ टप्प्यांमध्ये अनलॉक केलं जाणार आहे. या ५ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यानुसार ज्या जिल्ह्यात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल. यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होतील. जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण ४३ भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

काय सुरु राहणार ?

रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खासगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस १०० टक्के क्षमतेने सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.

अनलॉक कोणत्या टप्प्यात होणार

पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे, दुसर्‍या टप्प्यात ५ जिल्हे, तिसरा १० जिल्हे, चौथ्या टप्प्यात २ जिल्हे

मुंबई दुसऱ्या लेव्हलमध्ये

मुंबईत आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू होतील. सध्या मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंदच असणार आहेत. ठाणे पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा नसेल

उद्यापासून अंमलबजावणी

अनलॉकचा निर्णय उद्यापासून अंमलात आणला जाणार आहे. दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेणार आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट बघून जिल्ह्याचे टप्पे बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

पाच लेव्हल कशा आहेत?

पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के, तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट ५ ते १० टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट १० ते २० टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर

पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

लेव्हल २ मध्ये काय सुरु असणार?

लेव्हल २ मध्ये ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरु असतील. मॉल चित्रपट गृह ५० टक्के क्षमेतेने सुरु असतील. लोकल सुरु असणार नाही. सार्वाजिनक जागा, खुले मैदान , माॉर्निंग वॉक आणि सायकल चालवण्यास परवानगी असेल. शासकीय आणि खासगी सगळी कार्यालय खुली असीतल. क्रीडा सायंकाळ सकाळी ५ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत इनडोअर आणि आऊटडोर स्पोर्टस सुरु असतील. चित्रपट आणि मालिकांचं शुटिंग सुरु करण्यात येईल. सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के क्षमेतेने सुरु असतील. लग्न सोहळा मंगल कार्यालयात ५० टक्के आणि जास्तीत १०० लोक उपस्थितीत राहू शकतील. अंत्यविधी सोहळ्याला सगळ्यांना उपस्थितीत राहता येईल. मिटींग आणि निवडणूक हे कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत करण्यात येतील.

बांधकाम, कृषी कामे खुली करण्यात आली आहेत. ऑनलाईन , ई-कॉमर्स सुरु करण्यात आलं आहे. जीम सलून ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमेतेने सुरू करण्यात येणार आहेत. शासकीय बस १०० क्षमतेने टक्के सुरू असतील. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथं रेड झोन आहे तिथे जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

जिल्ह्यांची वर्गवारी :

पहिला गट : पहिल्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.

दुसरा गट : दुसऱ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे.

तिसरा गट : तिसऱ्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

चौथा गट : चौथ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

पाचवा गट : पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button