केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्र यांनी ४ दिवसांत राजीनामा द्यावा, अन्यथा…!
रामपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी येत्या मंगळवारी, १२ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा तसेच या प्रकरणातील आरोपींना अटक झाली पाहिजे, तसे न झाल्यास या मुद्द्यावरून शेतकरी देशव्यापी आंदोलन करतील, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेश सरकार व केंद्राला दिला आहे.
रामपूर येथे शेतकऱ्यांच्या एका सभेत टिकैत बोलत होते. विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेश सरकार व केंद्राचा तीव्र निषेध केला होता. लखीमपूर खेरी येथील हिंसाचारानंतर त्या घटनेचा धिक्कार करण्यासाठी शेतकरी काही ठिकाणी रस्त्यावर उतरले होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिषला अटक करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारात मरण पावलेल्या चार शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी ४५ लाख रुपये व सरकारी नोकरी तसेच जखमींना १० लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने ४ ऑक्टोबर रोजी केली होती. हा निर्णय घेण्याआधी त्या सरकारने शेतकरी संघटनांशी चर्चा केली होती.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल भाजप नेते वरुण गांधी यांना प्रामाणिकपणे काही वाटत असेल तर त्यांनी भाजपला सोडून देऊन आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊन पाठिंबा दिला पाहिजे, असे काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी म्हटले.