Top Newsस्पोर्ट्स

अंडर-१९ वर्ल्ड कप : भारत पाचव्यांदा जगजेता, इंग्लंडवर ४ गडी राखून विजय

प्रत्येक खेळाडूला मिळणार ४० लाख, बीसीसीआयची घोषणा

अँटिग्वा : भारताच्या युवा ब्रिगेडने १९ वर्षाखालील वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. अंतिम सामन्यात त्यांनी इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. भारतानं पाचव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकताना राज बावा आजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पाच गडी बात करत व ३५ धावा अशी अष्टपैलू कामगिरी केली. निशांत सिंधूने नाबाद ५० धावा करून भारताचा विजय पक्का केला. भारताने २००० मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली प्रथम १९ वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला होता. त्यानंतर २००८ ( विराट कोहली), २०१२ ( उन्मुक्त चंद) आणि २०१८ ( पृथ्वी शॉ) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली. अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला.

भारताच्या युवा गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना अंतिम सामन्यात इंग्लंडचा डाव १८९ धावांवर गुंडाळला. राज बावा आणि रवी कुमार या दोघांनी मिळून ९ गडी बाद केले. राज बावाने ९.५ षटकांत ३१ धावांत ५, तर रवी कुमारने ३४ धावांत ४ गडी बाद केले. रवी कुमारने इंग्लंडच्या सुरुवातीच्या दोन फलंदाजांना बाद केल्यानंतर राज बावाने मधल्या फळीला कापून काढताना चार गडी बाद केले. त्यानंतर रवी कुमारने इंग्लंडचा सेट फलंदाज जेम्स रेवला माघारी पाठवले आणि राज बावाने अखेरची विकेट घेत इतिहास रचला.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आठव्यांदा अंडर-१९ विश्वचषक २०२२च्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडने १९९८ साली जिंकलेल्या विश्वचषकानंतर त्यांना या स्पर्धेत बाजी मारता आलेली नाही. ६ बाद ६१ अशा अवस्थेतून जेम्सने इंग्लंडचा डाव सावरताना ८ व्या विकेटसाठी जेम्स सेल्ससह ९३ धावांची विक्रमी भागीदारी केली. ११६ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने ९५ धावा करणारा जेम्स रेवचा अफलातून झेल कौशल तांबेने टिपला. सेल्स ३४ धावांवर नाबाद राहिला. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ५ गडी बाद करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील दुसरा गोलंदाज ठरला. २००६ मध्ये अन्वर अलीने ३५ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. राज बावाने आज ३१ धावांत निम्मा संघ बाद करून सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

प्रत्युत्तरात, भारताचा सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी (०) पहिल्याच षटकात बाद झाला. हर्नूर सिंग (२१) व शेख राशिद यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करून डाव सावरला. त्यानंतर शेख व कर्णधार यश धुल यांचा सुरेख खेळ पाहायला मिळाला. पण, यावेळेस धुलला (१७) मोठी खेळी साकारता आली नाही. शेखही ८४ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५० धावांवर माघारी परतला. सामन्याला कलाटणी मिळाली असे वाटत असताना राज बावा व निशांत सिंधू यांनी पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करताना संघाला विजयासमीप पोहोचवले. गोलंदाजीत पाच विकेट्स घेणाऱ्या बावाने ३५ धावा केल्या. निशांतने नंतर फटकेबाजी केली, परंतु विजयासाठी १४ धावांची गरज असताना कौशल तांबेची (१) विकेट पडली. निशांतने मोक्याच्या क्षणी अर्धशतक झळकावून भारताचा विजय पक्का केला. भारतानं ४७.४ षटकांत ६ बाद १९५ धावा केल्या.

यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला होता. त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला. तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

महाराष्ट्राच्या कौशल तांबेचा अफलातून झेल

https://twitter.com/UpdateCricket_/status/1489999813122793476

या सामन्यात मराठमोळा खेळाडू कौशल तांबेने अप्रतिम झेल घेत सर्वांना थक्क केले. राज बावा आणि रवी कुमार यांनी जबरदस्त वेगवान गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. शतकी पल्ला गाठण्यापूर्वीच इंग्लंडचे सात शिलेदार तंबूत परतले होते. त्यानंतर जेम्स रियूने इंग्लंडसाठी धावा केल्या. त्याने ९५ धावांची खेळी केली. शतक पूर्ण करण्यापूर्वी तो रवी कुमारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रियूने पुल शॉट खेळला, सीमारेषेवर असलेल्या कौशलने दोन प्रयत्नात हा चेंडू टिपला. दुसऱ्या प्रयत्नात हातातून निसटलेला चेंडू कौशलने सूर मारत टिपला. त्याच्या या झेलचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

प्रत्येक खेळाडूला मिळणार ४० लाख

अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी केलेल्या भारताच्या यंगिस्तानचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेकजण ट्विटर, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघ आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सदस्यांचे अभिनंदन करत आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी या वर्ल्ड कप विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला ४० लाख आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २५ लाख बक्षीस रक्कम देणार असल्याचे जाहीर केले.

भारतीय संघाची वैशिष्ट्ये

https://twitter.com/BCCI/status/1490066535188414465

– भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आठव्यांदा अंडर-१९ विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडने १९९८ साली जिंकलेल्या विश्वचषकानंतर त्यांना या स्पर्धेत बाजी मारता आलेली नाही.

– १२ नोव्हेंबर २००२मध्ये हिमाचल प्रदेश येथे जन्मलेल्या राज बावा खेळाडूंच्या कुटुंबीयातील आहे. त्याचे आजोबा तारलोचन बावा हे १९४८ च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघाचे सदस्य होते. राज ५ वर्षांचा असताना आजोबांचे निधन झाले. १९४८ साली झालेल्या ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनवर ४-० असा विजय मिळवला होता, त्यामध्ये एक महत्वाचा गोल हा तारलोचन यांचा होता.

https://twitter.com/StarSportsIndia/status/1490017387369799687

– राजचे वडील सुखविंदर बावा हे हरयाणाच्या कनिष्ठ हॉकी संघाचे सदस्य होते. १९८८मध्ये त्यांचा १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या कॅम्पमध्येही निवड झाली होती. पण, स्लिप डिस्कमुळे त्यांनी २२ व्या वर्षी कोचिंगला सुरुवात केली. राज बावा याला डान्स करायला आवडतं आणि त्याला अभिनेता बनायचे होते. पण, वडिलांसोबत क्रिकेट मॅच पाहता पाहता तोही याच्या प्रेमात पडला.

– अंतिम सामन्यात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी २००६ मध्ये पियूष चावलाने ८ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या. रवी बिश्नोई, रवी कुमार आणि संदीप शर्मा यांनाही चारच विकेट घेता आल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button