मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी तीन पर्याय दिले आहेत. संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका घेत ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम सुद्धा दिला आहे. ६ जूनपर्यंत निर्णय झाला नाही, तर किल्ले रायगडावरून आंदोलन करणार असल्याचे संभाजीराजेंनी जाहीर केले आहे. ६ जून रोजी शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक यावेळी झाला. ६ जूनपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भावर निर्णय घेतला नाही तर रायगडावरून आंदोलनाची सुरूवात करणार असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे. मी स्वत: या आंदोलनात उतरणार अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचं वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचा दौरा करत विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली. “सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणता राजकीय अजेंडा घेऊन अजिबात आलेलो नाही. आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा. मी सांगू इच्छितो, २००७ सालापासून मी महाराष्ट्र पिंजून काढला कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात मराठा समाजावर अन्याय होतोय यासाठी माझा हा लढा आहे”, असं ते यावेळी म्हणाले.
“मला सगळ्या मराठा समाजाला सांगायचंय की न्यायमूर्ती गायकवाडांचा अहवाल अवैध ठरला आहे. आपला कायदा रद्द झाला आहे. आपण एसईबीसीमध्ये मोडत नाहीत. आपण सामाजिक मागास राहिलो नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला फॉरवर्ड क्लास, डॉमिनेटिंग क्लास असं म्हटलंय. आपण त्याला आव्हान देऊ शकत नाही. आम्ही दु:खी झालो. तेव्हा मी म्हणालो की उद्रेक कुणी करू नका, करोनाचं संकट समोर आहे. आपण जगलो तर लढू शकतो. अनेकांना वाटलं की संभाजी छत्रपतींची ही मवाळ भूमिका का? म्हणून मला सांगायचंय की छत्रपतींच्या घरात माझा जन्म झाला म्हणून मी तशी भूमिका घेतली. पण लगेच दोन दिवसांत दोन्ही पक्षांकडून आरोप सुरू झाले. सत्ताधारी म्हणतात पूर्वीचा कायदा खराब होता, विरोधी पक्ष म्हणतो यांनी बाजू नीट मांडली नाही म्हणून आमचं नुकसान झालं. पण समाजाला तुमच्या भांडणात रस नाही. आमचं एकच मागणं आहे की मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. तुम्ही लोकांना वेठीला धरू नका. माध्यासकट सर्व खासदार, आमदार मंत्र्यांनी समाजाला काय दिलं”, असं संभाजीराजे म्हणाले.
यावेळी संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपाय म्हणून ३ पर्याय सुचवले आहेत. तसेच, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्रपणेच यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं देखील यावेळी नमूद केलं.
खासदार-आमदारांची जबाबदारी आहे. म्हणून मी त्या दिवशी नाशिकमध्ये आक्रमक झालो. मी अस्वस्थ झालो आहे. हे सत्ताधारी आणि विरोधक असे कसे वागायला लागलेत? समाजाला न्याय द्या ही माझी भूमिका होती. म्हणून आम्ही महाराष्ट्राचा दौरा केला. कायदेतज्ज्ञांना भेटलो, अभ्यासकांनाही भेटलो. भावना समजू घेतल्या. याप्रसंगी मराठा समाजातले लोकं इतके दु:खी आणि अस्वस्थ आहेत. वेळप्रसंगी कायदा हातात घेतील अशी अवस्था आहे. पण माझ्यामुळे सगळे शांत आहेत. आम्हालाही आक्रमक होता येतं. पण ही वेळ आहे का आक्रमक व्हायची? किती वर्ष आपण या वर्गाचा वापर करायचा? मराठा समाजातला ३० टक्के वर्ग कधीच रस्त्यावर येत नाही. फक्त ७० टक्के गरीब वर्ग रस्त्यावर येत असतो. पण यापुढे आम्ही कुणीच हे चालून देणार नाही”, अशा शब्दांत संभाजी राजे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
ओबीसींमध्ये नवा प्रवर्ग शक्य आहे का?
मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची अनेक मराठा नेत्यांनी मागणी केली आहे. त्यांची ही भूमिका असू शकते. पण ओबीसींमध्ये नवा प्रवर्ग करणे शक्य आहे का? हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांनीच सांगावं, असं आवाहन खासदार संभाजी छत्रपती यांनी केलं.
पत्रकार परिषदेत संभाजी छत्रपती यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच मराठा आरक्षण टिकवण्यासाठी पर्यायही सांगितले. ओबीसीमध्ये नवीन प्रवर्ग तयार करणं शक्य आहे का? हे पाहावं. ते मी नाही सांगणार. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. वंचितांना आरक्षण मिळावं या मताचा मी आहे. शाहू महाराजांनी वंचितांना मुख्य प्रवाहात आणलं होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही भूमिका होती, असंही त्यांनी सांगितलं.
तीन पर्याय सत्ताधारी-विरोधकांना मान्य
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी संभाजी छत्रपती यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसमोर तीन पर्याय दिले आहेत. हे तिन्ही पर्याय त्यांनी मान्य केले आहेत. नंतर त्यांनी हे तीन पर्याय मान्य केले नाही तर त्याला तेच जबाबदार असतील असं ते म्हणाले. मराठा आरक्षण ही राज्य आणि केंद्राची जबाबदारी आहे. तुझं माझं करून चालणार नाही. इथं नवरा बायको म्हणूनच राहावं लागणार आहे. मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर कुटुंबासारखं वागावं लागेल. आता शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून व्हेटो काढावा लागेल. पण तो पूर्वीसारखा व्हेटो नसणार. तर व्हेटो म्हणजे गोड बोलून एकत्र येण्याचं काम करावं लागणार आहे, असं ते म्हणाले.
संभाजीराजेंनी सुचवलेले ३ पर्याय
१. Review Petition (रिव्ह्यू पिटीशन)
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी, असा पर्याय संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारला दिलाय. ही रिवह्यू पिटीशन फक्त लोकांना दाखवण्यासाठी नाही तर ती फुलप्रुफ हवी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केलीय.
२. Curative Petition (क्युरिटीव्ह पिटीशन)
राज्य सरकारने रिव्ह्यू पिटीशन दाखल केली आणि ती टीकली नाही, तर राज्य सरकारपुढे अजून एक पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे क्युरिटीव्ह पिटीशन. हा पर्याय कठीण आणि शेवटचा पर्याय आहे. त्यासाठी खूप तयारी करावी लागते. वरील दोन पर्याय राज्य सरकारच्या अधिकारात आहेत.
३. केंद्राकडे प्रस्ताव सादर करावा
राज्य सरकार आपला प्रस्ताव ३४२ (ए) अंतर्गत केंद्र सरकारकडे पाठवू शकतो. हा प्रस्ताव राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे जाऊ शकतो. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवतील. त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील. पण राज्यपालांना फक्त भेटून किंवा पत्र देऊन काही होणार नाहीत. त्यासाठी सर्व डाटा गोळा करावा लागेल. यात २-४ महिने जातील. वेळप्रसंगी जस्टीस गायकवाड समितीच्या अहवालातील त्रुटींवर अभ्यास करावा लागेल.
संभाजीराजे छत्रपती नवा पक्ष स्थापन करणार?
खासदार संभाजीराजे छत्रपती हे नवीन पक्ष किंवा संघटना स्थापन करून, मराठा आरक्षण लढा तीव्र करू शकतात. तसंच मराठा सोडून बहुजन समाजाला एकत्र आणून मराठा आरक्षण लढा नव्याने सुरू करण्याचीही शक्यता आहे. यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेनही सुरू करण्यात आलं आहे. राजकीय पक्षांशी फारकत घेऊन कोरोना संपल्यावर लढा अधिक तीव्र करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे हे भाजपला रामराम करून शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन पुन्हा खासदार पद मिळवू शकतात.