मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मुंबईला हजेरी लावत असतात. शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक आणि शिवप्रेमींचा जनसागर मुंबईत येत असतो. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने केले आहे. त्यामुळे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन संवादाद्वारे शिवसैनिकांशी बातचीत करतील. शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील उद्धव ठाकरे हा संवाद २३ जानेवारी रात्री आठ वाजता झूम वरून साधणार आहेत आहेत.
उद्धव ठाकरे कोणत्या मुद्यांवर ते भाष्य करतील हे पाहावं लागणार आहे. मुंबई महापालिका निवडणूक, शिवसेनेची आगामी निवडणुकांमधील वाटचाल आणि महाविकास आघाडी सरकारची कामगिरी या विषयावर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे या संवादाच्या माध्यमातून शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या निमित्तानं कानमंत्र देण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांनी बऱ्याच दिवसांपासून शिवसैनिकांशी संवाद साधलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधतील. या संवादाकडे तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागलंय.
राज्यात येत्या काळात मुंबई महापालिकेसह अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका येत्या काळात पार पडतील. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करुन आगामी निवडणुकांसाठी कानमंत्र देण्याची शक्यता आहे.