मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला होता. विरोधी पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील सरकार पाडण्याचा कारस्थान सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यातच आता शिवसेनेकडून केंद्रीय पातळीवर भाजपविरोधात लॉबी तयार करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यातील भेट ही त्यानिमित्तानेच होणार असल्याचे कळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के चंद्रशेखर राव यांना फोन करून येत्या २० फेब्रुवारीला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले आहे. शिवसेनेचा राष्ट्रीय स्तरावर मोट बांधण्याच्या अनुषंगानेच हा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा यानिमित्ताने आता सुरू झाली आहे.
राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतरच दुसऱ्यांदा भाजपविरोधात आता मुख्यमंत्रीही सक्रीय झाल्याचे दिसते आहे. त्याचाच भाग म्हणजे उद्धव ठाकरेंनी केसीआर यांना केलेला फोन हे समजले जात आहे. या फोनकॉलचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. केसीआर यांच्याकडून मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे या नव्या राजकीय समीकरणाला दिशा मिळणार का ? असाही अर्थ यानिमित्ताने लावला जात आहे. मोदी सरकारच्या विरोधात तसेच देशाच्या संघराज्य पद्धतीच्या संरक्षणासाठी केंद्राविरोधात केसीआर हे आंदोलन करणार आहेत. या लढ्याला पाठिंबा देण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी कॉल केल्याचे कळते. तसेच मुंबईतील २० फेब्रुवारीच्या भेटीत नेमके काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भाजपविरोधात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जोरदार आघाडी निर्माण करण्याच्या मुद्द्यावर के चंद्रशेखर राव यांच्याकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच केंद्रावर टीका केली जात आहे. त्यामुळेच राव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे याआधी सांगितले होते. या प्रस्तावाला आता उद्धव ठाकरेंनीही मंजूरी दिली आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुका भाजपविरोधात एकत्र लढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेनेकडूनही सांगण्यात आल्याचे कळते.