मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनं राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर आता सिंधुदुर्गात नारायण राणेंना शिवसेनेनं मोठा झटका दिल्याचं समजतंय. सिंधुदुर्गातील राणे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. देवगड नगर पालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकरू आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. देवगडच्या दोन नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे राणेंना हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर पलटवार करत येड्यांची जत्रा अशी उपमा दिली आहे.
देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. तसंच कणकवलीच्या माईन आणि कालमठ ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सरपंच धनश्री मेस्त्री आणि प्रज्ञा मिस्त्री यांचाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आलाय. दरम्यान, आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा करण्यात येत आहे. भविष्यात कणकवली मतदारसंघातील नितेश राणे यांचे निष्ठावंत म्हणवणारे अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतील आणि कणकवली शिवसेनामय होईल, असा दावाही करण्यात येतोय.
नितेश राणेंकडून पलटवार
आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून.. आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेड बनवायच..
यालाच म्हणतात "येड्यांची जत्रा" !! @CMOMaharashtra @uddhavthackeray— nitesh rane (@NiteshNRane) September 2, 2021
दरम्यान, नितेश राणे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक हे शिवसेनेचेच असल्याचा दावा केलाय. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उदय सामंत आणि वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधलाय. आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून.. आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेड बनवायच. यालाच म्हणतात येड्यांची जत्रा !! असं ट्विट नितेश राणे यांनी केलंय.