महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनीही कंगनाला सुनावले
नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भात केलेल्या विधानांवरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. कंगनाविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात असून, विविध स्तरातून तिच्यावर टीका केली जात आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस यांनी कंगनाला फटकारल्यानंतर आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी कंगनाला सुनावले आहे.
ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. हे तेच लोक होते ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचे रक्तही उसळले नाही. हेच लोक आम्हाला शिकवतात, जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्या गालावर दुसरी थप्पड खा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असे कंगनाने म्हटले होते. यानंतर तुषार गांधी यांनी एका लेखाच्या माध्यमातून कंगनावर पलटवार केला आहे.
दुसरा गाल पुढे करण्यासाठी गांधींचा द्वेष करणारे समजतात त्यापेक्षा जास्त हिंमत लागते. गांधीवादी फक्त दुसरा गाल पुढे करतात, असा आरोप करणारे भित्रट असून यासाठी लागणारे धाडस ते समजू शकत नाहीत. हे धैर्य समजून घेण्यास ते असमर्थ आहेत. पण आपण विसरता कामा नये. दुसरा गाल पुढे करणे हे भीतीचे लक्षण नाही. यासाठी खूप धाडस लागते आणि हे त्यावेळच्या भारतीयांनी मोठ्या प्रमाणात दाखवून दिले होते. ते सर्वजण हिरो होते, तर भित्रट लोक आपल्या डोळ्यांची पापणीही न हालवता वैयक्तिक फायद्यासाठी दयेसाठी याचना करत होते, असे तुषार गांधी यांनी म्हटले आहे.
याच फकिरासमोर ब्रिटीश राजवटीची शरणागती
तुम्ही खोटे कितीही जोरात ओरडून सांगितले आणि सत्याचा आवाज कितीही छोटा वाटत असला तरी तेच टिकते. खोटे जिवंत ठेवण्यासाठी एकामागोमाग अनेक खोटे सांगावे लागते. सध्याच्या घडीला काही खोट्या गोष्टी ओरडून सांगितल्या जात आहेत, ज्यांना उत्तर देणे गरजेचे आहे. बापू भिकारी म्हणून शिक्का मारल्याचे स्वागत करतील. आपल्या देशासाठी, लोकांसाठी त्यांची भीक मागायला हरकत नव्हती. ब्रिटीश पंतप्रधानांनी अर्धनग्न फकीर म्हणून हिणवल्याचेही त्यांनी कौतुक केले होते. पण शेवटी याच फकिरासमोर ब्रिटीश राजवट अखेर शरण आली, असे तुषार गांधी यांनी म्हटले आहे.