Top Newsराजकारण

त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटणे अयोग्य : शरद पवार

...तर राष्ट्रवादीही स्वबळावर निवडणूक लढणार

नागपूर : त्रिपुरात काही घडले त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणे ही अयोग्य बाब आहे. ज्याप्रमाणे कायदा हातात घेण्यात आला व हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले ते चुकीचेच होते. त्रिपुरात काही झाले यात दुकानदार, व्यापाऱ्यांची काय चूक? त्यांना किंमत मोजायला लागली. अशा निष्पाप दुकानदार, व्यापाऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात का होईना, पण भरून देण्यासाठी सरकारने मदत धोरण तयार करावे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मांडले आहे. दरम्यान, नागपूर महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढणार का? हे आत्ताच सांगता येणार नाही पण आघाडी केलेले पक्ष एकत्र लढले तर फायदा होईल. आगामी निवडणुकांमध्ये आघाडी केलेले पक्ष एकत्र आले तर योग्य आहे. नाही तर एकटं लढू असा इशाराच शरद पवारांनी काँग्रेस आणि शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

शरद पवार नागपुरातील एका कार्यक्रमात आणि पत्रकार परिषदेत बोलत होते. पवार म्हणाले की, अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाली होती. समस्या कुठली असो आणि त्यावर रिएक्शन होणे योग्य नाही. काही लोकांनी कायदा हातात घेतला. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जावी. अशा हिंसाचाराचा सर्वात वाईट परिणाम हा व्यवसाय आणि उद्योगांवर होतो. या दोन्ही क्षेत्रांचा दंगलीसोबत काहीही संबंध नाही मात्र सर्वाधिक फटका त्यांना सहन करावा लागतो असं त्यांनी सांगितले. तसेच प्रभावित झालेल्या व्यापारी आणि उद्योजकांना मदत देण्यासाठी सरकारने धोरण तयार करण्याची गरज आहे. कुठलंही सरकार १०० टक्के मदत करू शकत नाही. पण पॉलिसीत सुधार करण्याची आवश्यकता असल्याचंही पवारांनी सांगितले.

गडकरींचे कौतुक, तर फडणवीसांचा टोला

प्रादेशिक असमतोलामुळे काही भागातील विकासाला चालना मिळू शकली नाही. प्रत्येक भागाचा विकास करणे ही राज्य चालविणाऱ्यांची जबाबदारी असते. अनेकदा नेते जेथून येतात त्या भागाचा जास्त विकास होतो. पाच वर्षात विदर्भातील नेतृत्व असून देखील उद्योग क्षेत्राच्या समस्या दूर होऊ शकल्या नाही. त्या समस्या तेव्हाच सोडविल्या जाऊ शकत होत्या. नेतृत्वात विकासदृष्टी हवी अशा शब्दात शरद पवारांनी उल्लेख न करता देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. तर दुसरीकडे केंद्र सरकारमध्ये काही पक्ष, प्रांत यांचा विचार न करता पूर्ण देशाच्या विकासाचा विचार करतात. संसदेत कुणाचीही समस्या दूर करण्याची इच्छा दाखविणारे कमी मंत्री आहेत, त्यात नितीन गडकरी यांचे नाव अग्रक्रमाने येते. प्रत्येक समस्यांचे निवारण त्यांच्याकडे आहे. ते एक असे व्यक्ती आहेत की जे बघत नाहीत, की समोरचा व्यक्ती हा कुठल्या पक्षाचा आहे. त्यांच्या समोर समस्या आल्यात की त्याचा तोडगा ते काढणार अशा शब्दात पवारांनी नितीन गडकरींचं कौतुक केले आहे.

…तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार

येत्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का? यावर अद्याप संभ्रम आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष स्वबळाची भाषा करत आहे. आता खुद्द शरद पवार यांनीच आगामी निवडणुकांमध्ये आघाडी केलेले पक्ष एकत्र आले तर योग्य आहे. नाही तर एकटं लढू असा इशाराच शरद पवारांनी काँग्रेस आणि शिवसेनेला दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप जास्त ताणू नये

एसटीचा संप तुटेपर्यंत ताणू नये असं सांगत शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केले आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, काही प्रश्न सोडवावे लागेल. एसटी महामंडळांचं विलीगीकरण लगेच शक्य नाही असं शरद पवारांनी सांगितले आहे.

‘ते’ पुरावे अद्याप माझ्याकडे पोहोचले नाहीत

मंत्री नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. मंत्री नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असणारे पुरावे मी शरद पवारांना देणार असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, मलिकांविरोधात पुरावे देऊ असं म्हणणाऱ्यांनी पुरावे अजून दिले नाहीत. बेछूट आरोप करायचे आणि त्याला सामोरं जायचं नाही. अनिल देशमुखांना कोठडीत जावं लागलं. काहीही संबंध नसताना त्यांना कोठडीत जावं लागतं हा त्यांच्यावर अन्याय आहे असं सांगत पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच महात्मा गांधींना साऱ्या जगाने स्वीकारले असं सांगत अभिनेत्री कंगना रणौतच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button