घरोघरी रेशन आणि पेन्शन, भत्त्याचं ममता बॅनर्जींचं आश्वासन
तृणमूल काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. ममता यांनी आज झाडाग्राम इथं 2 प्रचार रॅली केल्या आणि त्यानंतर लगेच त्या कोलकाता इथं परतल्या. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी ममता यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यात रेशन, पेन्शन आणि भत्त्यांचाबाबतच्या घोषणाचा समावेश आहे.
तृणमूल काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील घोषणा : 18 वर्षाच्या विधवेला 1 हजार रुपये विधवा पेन्शन दिली जाणार; घरोघरी रेशन पोहोचवलं जाणार, सध्या राज्य सरकार नि:शुल्क रेशन देत आहे; पुन्हा सत्तेत आल्यास विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसह आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना 1 हजार रुपये दिले जाणार; ओबीसी, एसटी आणि एससी प्रवर्गातील लोकांना प्रति वर्षी 12 हजार रुपये दिले जाणार; सामान्य परिवारातील लोकांना प्रति महिना 500 रुपये; अनुसूचित जाती आणि जमातीच्या परिवारातील मोठ्या महिलेला 1 हजार रुपये दिले जाणार; शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जातात. पण आता 10 हजार रुपये दिले जाणार; 10 लाखाचं क्रेडिट कार्ड विद्यार्थ्यांना दिलं जाणार; मंडल आयोगानुसार ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करुण घेण्यासाठी आयोगाची स्थापना होणार; उद्योगांच्या विकासावर भर दिला जाणार; विद्यार्थी, महिला आणि युवकांना सुरक्षा दिली जाणार; टॅब आणि सायकलसाठी 10 हजार रुपये दिले जाणार
शुभेंदु अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांच्यावर TMCकडून गंभीर आरोप करण्यात आलाय. अधिकारी यांचं नंदीग्राम आणि हल्दिया अशा दोन ठिकाणच्या मतदार यादीत नाव असल्याचा आरोप आहे. तत्पूर्वी, शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही एक आरोप केला होता. ममता यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांच्यावरील काही गुन्हे लपवल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे. त्यानंतर आता TMC कडून अधिकारींवर दोन मतदारसंघातील मतदार यादींमध्ये नाव असल्याचा आरोप केलाय. तसंच निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करण्याची मागणीही TMC कडून करण्यात आली आहे. इतकच नाही तर नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतून अधिकारी यांचं नाव वगळण्याची मागणीही TMCने केली आहे.