Top Newsराजकारण

कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर तिरंगा, त्यावर भाजपचा झेंडा; विरोधक आक्रमक

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचं शनिवारी रात्री निधन झालं. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून ते आजारी होते. कल्याण सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. तर, जे.पी. नड्डा यांनी कल्याणसिंह यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज टाकून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यावरुन, आता चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेसने नड्डा यांचा फोटो शेअर करत हा तिरंग्याचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींसह नड्डा यांनी कल्याणसिंह यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी, त्यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज गुंडाळून कार्यकर्त्यांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिली. कल्याणसिंह यांची अखेरची इच्छा असल्याने त्यांच्या पार्थिवाला हा ध्वज गुंडाळण्यात आला होता. यावेळी, पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपानेही तो फोटो ट्विट केला आहे. त्यावरुन, युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. युवक काँग्रेसने ट्विट करुन, हा तिरंग्याचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. ‘तिरंगे का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान।’, असे ट्विट युथ काँग्रेसने केले आहे.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनीही हा फोटो शेअर केला आहे. तसेच, नव्या इंडियात देशाच्या राष्ट्रध्वजावर भाजपचा झेंडा लावणं योग्य आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यावरुन, आता भाजप नेत्यांवर टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनीही भाजपला लक्ष्य केलं आहे. देशापेक्षा पक्ष मोठा आहे, राष्ट्रध्वजावर भाजपच झेंडा. नेहमीप्रमाणं भाजपला ना दु:ख, ना खेद, ना पश्चाताप, असे तिवारी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.

कल्याणसिंह यांची होती इच्छा

कल्याण सिंह यांनी दुसऱ्यांदा भाजपात प्रवेश केल्यानंतर आयोजित एका सभेत बोलताना आपली शेवटची इच्छा बोलून दाखवली होती. माझ्या रक्तात संघ आणि भाजपचे संस्कार आहेत. मी आयुष्यभर भाजपात राहावं आणि मृत्यूनंतर माझ्या पार्थिवाला भाजपच्या ध्वजात गुंडाळूनच स्मशानभूमित नेण्यात यावं, असे कल्याणसिंह यांनी म्हटलं होतं. त्यांनी आपली शेवटची इच्छा यावेळी बोलून दाखवली होती. त्यामुळेच, नड्डा यांनी त्यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज गुंडाळल्याचे दिसून आले.

नियम काय?

भारतीय ध्वज संहिता, कलम 2.2 मध्ये असं सांगितलं गेलंय, कोणताच झेंडा राष्ट्रध्वजाच्या वर, त्यापेक्षा जास्त
उंच किंवा साईडमध्ये ठेवू नये. ज्यावर झेंडा फडकवला जातो, त्याच्यावर फूल, माळा, किंवा इतर कुठलेही
प्रतिक, वस्तू ठेवली जाऊ नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button