मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे अनेक घडामोडी पाहण्यास मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व नेत्यांची बैठक घेतल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे ही बैठक राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची आज दुपारी १२.३०० च्या सुमारास वर्षा निवास्थानी बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील विविध घडामोडी, राज्यपाल नियुक्तं १२ आमदारांचा प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच, मुंबईतील गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या मुद्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आता उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कोविड संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका, महामंडळांच्या नेमणुका, तसंच महाविकास आघाडीतील काही राजकीय प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यत व्यक्तं केली जात आहे.
विशेष म्हणजे, नुकतीच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज निवडणुकीच्या बाबतीत चर्चा झाली. लांबणीवर पडलेल्या महापालिकेच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये १० पालिकांची मुदत संपणार आहे तर १०० नगरपालिकांची मुदत संपत आहे. या दरम्यान कोविडची परिस्थिती पाहता निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व स्थानिक निवडणुका या फेब्रुवारीमध्ये होतील हे निश्चित झाले आहे.