मुंबई : मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरून गेला. राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. आगामी नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा आणणार , अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
राज्यातील महिला सुरक्षा तसंच महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजना, महिला विषयक गुन्हे, बाल अत्याचार प्रतिबंधक यांच्या अनुषंगाने तपास आणि कार्यवाहीबाबत राज्यातील सर्व जिल्हे, आयुक्तालयनिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
साकीनाका परिसरात घडलेली घटनाही संतापजनक आहे. या प्रकरणाचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. महिलांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी आगामी नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा आणणार आहोत, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात एकमेकांना ओळखणारे व्यक्तीचे प्रमाण अधिक आहे. राज्यात पोलीस आपल्या क्षमतेने काम करत आहेत. महिला अत्याचार बाबत तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्याचा सूचना दिल्या आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलिसांना अतिदक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत नुकतीच साकीनाका पोलीस ठाणे हददीत रात्रीच्या वेळी एकटया महिलेवर अत्याचाराची घटना घडलेली असून महिला सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये याकरीता मुंबई पोलिसांनी उपाययोजना कराव्यात, असे आदेश मुंबई पोलिस आयुक्त यांनी दिले आहेत.
– साकीनाका येथील घटनेच्या वेळी पोलिसांचा प्रतिसाद १० मिनिटाचा होता. अशा घटनामध्ये नियंत्रण कक्षाची भूमिका अत्यंत महत्वाची असून कोणत्याही कॉल विशेष करून महिलांसंदर्भात कॉलकडे दुर्लक्ष करू नये व त्याची तात्काळ योग्य ती निर्गती करावी. नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी यांनी यावर सतत लक्ष ठेवावे.
– पोलीस ठाणे हद्दीतील अंधाराची ठिकाणे, निर्जन ठिकाणांचा आढावा घेवुन त्या ठिकाणी बीट मार्शल, पेट्रोलिंग मोबाईल वाहने यांची जास्तीत जास्त गस्त ठेवावी.
– अंधाराच्या व निर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्याकरीता महानगर पालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा तसेच अशा ठिकाणी सी.सी.टी.व्ही बसविण्याकरीता संबंधीताकडे प्रस्ताव सादर करून याबाबत पाठपुरावा करावा.
– निर्जन स्थळी, अंधाराच्या ठिकाणी क्यूआर कोड लावावेत, जेणेकरुन अनुचित प्रकार टाळता येईल व त्यास प्रतिबंध करता येईल
– पोलीस ठाणे हददीत ज्या ठिकाणी सार्वजनिक महिला प्रसाधनगृहे आहेत, त्या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पुरेशी लाईट व्यवस्था करून घ्यावी तसच त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक ५ गस्त ठेवावी
– गस्ती दरम्यान पोलिसांनी संशयीत व्यक्ती आढलळी तर त्याची चौकशी करावी तसच गरज वाटल्यास कारवाई करावी
– रात्री गस्ती दरम्यान एखादी महिला एकटी आढळून आल्यास महिला पोलीस अधिकारी/ अंमलदारांमार्फत विचारपूस करून त्यांना तत्काळ योग्य ती मदत देण्यात यावी. गरज भासल्यास सदर महिलेस सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी.
– पोलीस ठाणे हददीतील अंमली पदार्थांची नशा करणारे व अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांवर योग्यती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.
– पोलीस ठाणे हददीत रस्त्यावर बेवारसरित्या बऱ्याच काळापासून उभ्या असलेल्या टेम्पो, टॅक्सी, टूक व गाड्याच्या मालकांचा शोध घेवून वाहने त्यांना तेथून काढण्यास सांगणे अन्यथा अशी बेवारस वाहने ताब्यात घेवून पुढील कारवाई करावी.
– महिलांसंबंधीत गुन्ह्यात कलम ३५४, ३६३, ३७६, ५०९ भादवि व पोस्को कायद्याअंतर्गत अटक आरोपींचा स्वतंत्र अभिलेख तयार करण्यात यावा (8९५५8 णशा 151) व अशा सर्व आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी.
– ज्या पोलीस ठाणेच्या हद्दीत रेल्वे स्थानके आहेत व बाहेरून येणाऱ्या लांब पल्याच्या गाडया थांबतात अशा सर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोलीस बंदोबस्ताकरीता एक मोबाईल वाहन रात्री १० वा ते सकाळी ७०० वाजेपर्यंत तैनात करण्यात यावी.
– मोबाईल वरील कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांनी एकट्या येणाऱ्या महिलांची विचारपूस करावी. तसंच त्यांना योग्य ती मदत करून त्यांना इच्छित स्थळी पोहचण्याकरीता वाहनांची गरज असल्यास वाहन उपलब्ध करून त्या वाहनांचा कमांक, वाहनावरील चालकाचा मोबाईल कमांक नोंद करून घेतील. संबंधीतांनी नमूद एकटया महिलेस विहित स्थळी सुरक्षित पोहचविले आहे किंवा कसे, याबाबत खात्री करावी.
– ज्या पोलीस ठाणे हददीत रेल्वे स्थानके आहेत अशा पोलीस ठाणेतील रात्रौ गस्तीवरील अधिकार्यांनी रेल्वे स्थानका बाहेर भेटी दयाव्यात व तेथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. उपरोक्त सुचनांची सर्व संबंधीतांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्यात कोणीही दुर्लक्ष करणार नाही याची दक्षता घ्यावी.