तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
डेहराडून: भाजपचे गढवाल येथील खासदार तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. विधीमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. बुधवारी दुपारी 4 वाजता तीरथ सिंह रावत मुख्ममंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत कलह सुरू आहे. त्यामुळे त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यात नवा मुख्यमंत्री नियुक्त करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. आज डेहराडून येथे भाजपच्या विधीमंडळ गटनेत्यांची बैठक झाली. त्यात तीरथ सिंह रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने उत्तराखंडमधील पेच सुटला आहे.
तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडच्या गढवाल लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. ते उत्तराखंड भाजपचे अध्यक्षही राहिलेले आहेत. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सचिवही आहेत. त्याशिवाय भाजपच्या राज्यस्तरावरील अनेक पदांवर त्यांनी काम केलं आहे. मुख्यमंत्रीपदी नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रावत यांनी मीडियाशी संवाद साधला. मी संघासाठी काम करत होतो. भाजपमध्ये येण्याचा कधीच विचार केला नव्हता. परंतु अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मी सक्रिय राजकारणात आलो, असं रावत म्हणाले. माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यासोबत मी दीर्घकाळ काम केलं होतं. आधी संघप्रचारक म्हणून काम केलं. त्यानंतर पार्टी आणि सरकारच्या स्तरावर काम केलं. आजही त्रिवेंद्र सिंह रावत आपले मार्गदर्शक असल्याचं त्यांनी सांगितलं.