Top Newsराजकारण

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक बंदोबस्त

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला छावणीचे रुप आले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पहारा ठेवण्यासाठी संपूर्ण दिल्लीत २७ हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच संपूर्ण परेडच्या ३६० डिग्री कव्हरेजचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक प्रसारक दूरदर्शन ५९ कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रजासत्ताक दिनाचे थेट प्रक्षेपण करेल.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय राजधानीत सुरक्षेसाठी २७ हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले असून दहशतवादविरोधी यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त (डीसीपी), सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) आणि निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सशस्त्र पोलीस दल आणि कमांडो, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे अधिकारी आणि जवानही तैनात करण्यात आले आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अस्थाना यांनी सांगितले की, परेडच्या सुरक्षेसाठी ७१ डीसीपी, २१३ एसीपी आणि ७५३ निरीक्षकांसह दिल्ली पोलिसांचे २७,७२३ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ६५ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत, दिल्ली पोलिसांनी इतर सुरक्षा एजन्सींच्या समन्वयाने दहशतवादविरोधी उपाययोजना अधिक मजबूत केल्या आहेत.

देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे भारतीय हवाई दलाच्या ७५ विमानांद्वारे विविध कलाकृती दाखवल्या जाणार आहेत. तसेच, फ्लाय-पास्टचे नवीन पैलूदेखील थेट प्रदर्शनात पाहायला मिळतील. यासाठी सरकारकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शनने नॅशनल स्टेडियम, राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवन दरम्यानच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. याशिवाय, लोकांना संपूर्ण सोहळ्याचे विहंगम दृश्य देण्यासाठी दोन ‘३६० डिग्री कॅमेरे’ बसवण्यात आले आहेत. यातील एक कॅमेरा राजपथावर आणि दुसरा इंडिया गेटच्या वर बसवण्यात आला आहे.

यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या कव्हरेजसाठी १६० हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दूरदर्शनने राजपथवर ५९ कॅमेरे बसवले आहेत. मंत्रालयाने सांगितले की, राजपथ, राष्ट्रीय युद्ध स्मारक, इंडिया गेट येथे ३३ कॅमेरे, नॅशनल स्टेडियमवर १६ कॅमेरे आणि राष्ट्रपती भवन येथे १० कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे संपूर्ण कव्हरेज ‘डार्क फायबर ऑप्टिकल कनेक्टिव्हिटी’, ‘सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी’ आणि ‘बॅकपॅक कनेक्टिव्हिटी’द्वारे सर्व प्रमुख स्थानांना जोडून एकत्रित केले गेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button