ज्यांना यायचं ते येतील, आम्ही आमचं काम केलंय; भुजबळांचा फडणवीसांना सणसणीत टोला
नाशिक : नाशिकमध्ये सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी भाजपची नाराजी दूर करण्यासाठी शिष्टाई करुनही राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनाला अनुपस्थित राहत नाराजी व्यक्त केली. फडणवीसांच्या नाराजीबाबत विचारलेल्या प्रश्नावर भुजबळांनी आपली भूमिका मांडली. ज्यांना यायचं ते येतील, आम्ही आमचं काम केलंय अशा शब्दात भुजबळांनी फडणवीसांना सणसणीत टोला हाणला.
संमेलनाबाबत भाजपच्या नेत्यांना निमंत्रण नव्हते, तसेच, पत्रिकेत महापौरांचं नाव नसल्यानं या संमेलनात सहभागी होणार नसल्याची भूमिका महापौरांनी घेतली होती. मात्र, भुजबळांनी फडणवीस आणि महापौर सतीश कुलकर्णी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत त्यांना संमेलनाचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळं शनिवारी नाशिक दौऱ्यावर असलेले फडणवीस संमेलनात उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, साहित्य संमेलनात वीर सावरकरांचा यथोचित सन्मान करण्यात आला नाही. जिथे आमचे आदर्श अपमानित होत असतील तिथे जाऊन तरी काय करायचं, अशा शब्दांत फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली होती.