मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा दर वाढल्यानं सरकारनं खबरदारीच्या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठीची नियमावली जाहीर केली आहे. कोरोना संक्रमणाची परिस्थिती लक्षात घेता ३१ डिसेंबर २०२१ आणि १ जानेवारी २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणाने साजरे करावे, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. यासंदर्भातील एक परिपत्रकच जारी करण्यात आलं आहे.
राज्यासह संपूर्ण देशभरात आता ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटामुळे चिंता निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारला पुन्हा निर्बंध लागू करावे लागत आहेत. राज्यात २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशांच काटेकोरपणे पालन करण्यात यावे आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात आलं आहे.
नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमासाठी नियमावली :
१. नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच साधेपणानं नववर्ष स्वागताचं सेलिब्रेशन करावं.
२. २५ डिसेंबर २०२१ पासून राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक जणांना एकत्र जमण्यावर बंदी
३. ३१ डिसेंबर रोजी नववर्ष स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांसाठी बंदिस्त सभागृहात एकूण क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्क्यांच्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असणार आहे.
४. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जाईल, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला जाईळ याकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे.
५. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागिरकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे.
६. ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंग राहिल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
७. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाइन्स, गिरगाव चौपाटी, जुहून चौपाटी इत्यादी ठिकाणी देखील गर्दी करू नये.
८. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन केलं जावं.
९. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही धार्मिक स्थळी गर्दी करू नये. तसेच कोणत्याही मिरवणुका आणि कार्यक्रमांना बंदी राहिल.