आरोग्यराजकारण

राज्यात लॉकडाऊन नाही, पण निर्बंध अधिक कठोर होणार; राजेश टोपेंंचे संकेत

औरंगाबाद : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. दोन दिवसात आकडे दुप्पट होत आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण राज्यात लॉकडाऊनचा सध्या कोणताही विचार नाही. केवळ निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत सरकार काम करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यात दोन दिवसात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होत असल्याचं दिसून येत आहे. आजचाही राज्याचा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा १२ ते १५ हजारांच्या घरात जाऊ शकतो असा अंदाज आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या संसर्गाचं प्रमाण अधिक असू नये एवढंच काळजीची गोष्ट आहे. कारण यात मृत्यूदर अधिक आहे. त्यामुळे डेल्टा आणि ओमायक्रॉनचे रुग्ण यांच्यातील प्रमाण कळणं आवश्यक आहे. याबाबतच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी लॉकडाऊनचा कोणताही विचार सरकारनं केलेला नाही. मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य विभागाची तब्बल दोन तासाहून अधिक काळ बैठक झाली. यात लॉकडाऊनचा विषय देखील निघालेला नाही. पण निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत निर्णय घेतले जाऊ शकतात. तसंच सध्या लागू असलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे पालन केलं जाईल याकडे लक्ष देण्यावर भर असणार आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

राज्यात बेड्स आणि ऑक्सिजनच्या उपलब्धेनुसारच निर्बंधांबाबचे पुढील निर्णय घेतले जातील. ज्यादिवशी राज्यात ७०० मेट्रीक टनपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज भासेल तेव्हा राज्य ऑटोमोडमध्ये लॉकडाऊनमध्ये जाईल. पण सध्या तसा अजिबात विषय नाही. लॉकडाऊन म्हटलं की त्याचा थेट अर्थकारणावर परिणाम होतो. हातावर पोट असलेल्यांना याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे लॉकडाऊनचा कोणताही विषय सध्या झालेला नाही, असं राजेश टोपे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button