कोल्हापूर : येत्या १६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू स्मारक समाधी परिसरात मूक आंदोलन होणार असून मंत्री, खासदार व आमदारांनी मराठा आरक्षणासाठी नक्की काय करणार याची ठोस भूमिका तेथे जाहीर करावी, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. या आंदोलनाची टॅगलाईन ‘आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय’ अशी असेल. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्त रायगडावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात भाष्य केले. तसेच, मराठा आरक्षणासाठी १६ जून रोजी पुन्हा आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची घोषणाच त्यांनी रायगडावरुन केली होती. आधीचं आणि आत्ताचं सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुम्ही आरक्षणाचा खेळ सुरू केलाय का? हा खेळ करू नका. तुम्ही माझा संयम पाहिला आहे. मी संयमी असल्याचा मला अभिमान आहे. परंतु पुढे काय होईल ते होईल मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात संभाजीराजेंनी भूमिका मांडली होती. मात्र, १६ जूनचे आंदोलन हे मूक मोर्चा नसल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केले आहे.
येत्या १६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू स्मारक समाधी परिसरात मूक आंदोलन होणार असून मंत्री, खासदार व आमदारांनी मराठा आरक्षणासाठी नक्की काय करणार याची ठोस भूमिका तेथे जाहीर करावी, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. १६ जूनला दहा ते एक या वेळेत लाक्षणिक उपोषण होणार असून, आंदोलनाच्या परिसरात कोल्हापूर व राज्यातील समन्वयक, २१८५ विद्यार्थी असणार आहेत. त्यांच्यासमोर लोकप्रतिनिधींनी सन्मानपूर्वक येऊन भूमिका मांडावी, असेही त्यांनी म्हटले. सकल मराठा समाजाच्या कोल्हापुरातील समन्वयकांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
संभाजीराजे उदयनराजेंना उद्या पुण्यात भेटणार
खासदार छत्रपती संभाजीराजे उद्या म्हणजे शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेणार आहेत. पुण्यात उद्या दुपारी १२ वाजता ही भेट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर, संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौरा करुन सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. मात्र त्यांची आणि उदयनराजेंची भेट झाली नव्हती. आता दोन्ही राजेंची भेट ठरली आहे. उद्या पुण्यात भेटून दोन्ही राजे मराठा आरक्षणाच्या पुढील लढाईची दिशा ठरवणार आहेत.
संभाजीराजे माझे धाकटे भाऊ : उदयनराजे
संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं होतं. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.