कोणत्याच लसीपासून १०० टक्के संरक्षण नाही; बुस्टर डोसबाबत चाचपणी सुरू : नीती आयोग
नवी दिल्ली : कोणत्याच लसीपासून १०० टक्के संरक्षण मिळत नाही. त्यामुळे जर बुस्टर डोसची आवश्यकता असेल तर तसे जनतेला कळविले जाईल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूपासून अधिक संरक्षण मिळावे यासाठी बूस्टर डोसची गरज आहे का, याविषयी सध्या अभ्यास सुरू आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही सर्व प्रतिबंधक नियम पाळणे आवश्यक आहे. लसीमुळे कोरोनापासून काही प्रमाणात संरक्षण मिळेल; मात्र तरीही प्रत्येकाने सावध राहायला हवे. कोणतीच लस रोगापासून १०० टक्के संरक्षण देत नाही, हे नेहमीच लक्षात ठेवावे.
डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, देशातील कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या लसींचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
भारत बायोटेक या कंपनीने आपली उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी काही पावले उचलली आहेत. काही महिन्यांतच ही कंपनी दर महिन्याला १० कोटी लसींचे उत्पादन करू शकेल. सिरम कंपनीही लवकरच दर महिन्याला ११ कोटी लसींचे उत्पादन करणार आहे.
फायझरची लस जुलैमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता
व्ही. के. पॉल म्हणाले की, फायझर कंपनी त्यांची लस भारतामध्ये जुलै महिन्यात उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. ही लस मिळविण्याबाबत फायझर कंपनीशी केंद्र सरकार सध्या चर्चा करीत आहे. कारवाईपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी फायझरने केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत व्यापक जनहित लक्षात घेऊनच केंद्र सरकार निर्णय घेईल.