लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जवळ येत असताना चांगलेच राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशात भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी यांच्यातच मुख्य लढत असल्याचे दिसून येते. या निवडणुकीत काँग्रेसची कमान प्रियंका गांधी यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बरेली कँटमधील काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया आरोन यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे, युपीतील राजकारणात पक्षप्रवेशाच्या मजेशीर घटना घडत आहेत. त्यातच, काँग्रेसने निकालानंतर समाजवादी पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केलंय.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी निवडणूक निकालानंतर आघाडीची शक्यता बोलून दाखवली. समाजवादी पक्षाला गरज असल्यास काँग्रेस आपला पाठिंबा देईल, असे प्रियंका गांधींनी जाहीर केले आहे. अखिलेश यांना सरकार स्थापनेसाठी काँग्रेस निश्चितच मदत करेल. मात्र, युवक आणि महिलांसाठी काँग्रेसने दिलेल्या अजेंड्यावर समाजवादी पक्षाने चालायला हवे, असेही गांधींनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष हा समाजवादी पक्षासोबतच्या आघाडीला मान्य करतो. कारण, ते विचारधारेच लढाई लढत आहेत. महिलांचे सशक्तीकरण करण्याची लढाई ते लढत आहेत, असेही प्रियंका यांनी सांगितले.
सत्ता आल्यास ३०० युनिट वीज मोफत : अखिलेश यादव
दरम्यान, अखिलेश यादव म्हणाले की, आम्ही उत्तर प्रदेशच्या लोकांसाठी काही निर्णय घेतले आहेत. समाजवादी पार्टीने नवीन वर्षात उत्तर प्रदेशात सरकार आल्यास ३०० युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाणार आहे. मागील सरकारमध्येही आम्ही लॅपटॉपचे वाटप केले होते, प्रत्येक लॅपटॉपची स्वतःची कहानी आहे, ज्याला लॅपटॉप मिळाला त्याला खूप मदत मिळाली, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. २०२२ मध्ये सायकलच येणार. जर सरकार स्थापन झाले तर आम्ही २२ लाख नोकऱ्या आणि यूपीच्या तरुणांना फक्त आयटी क्षेत्रात रोजगार देऊ. आयटी क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. यूपीमध्ये आयटी हब बनवण्यात येणार आहे, असे अखिलेश यादव यांनी सांगितले.
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार होते, पण ते शक्य झाले नाही : प्रियंका गांधी
राजकारणातील चाणक्य समजले जाणारे दिग्गज रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याविषयी पुन्हा एकदा चर्चा समोर आल्या आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी यामागील कारणे सांगितली आहेत. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, ते शक्य झाले नाही. यामागे अनेक कारणे आहेत. त्यामुळे आमची पार्टनरशीप सुरू होऊ शकली नाही. या मुद्द्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले. अनेक मुद्दे होते, ज्यात दोन्ही बाजूंनी सहमती झाली नाही, त्यामुळे चर्चा झाल्या असल्या तरी गोष्टी अंतिम झाल्या नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
काँग्रेसमध्ये बाहेरील व्यक्ती नको, या चर्चांवर बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसमध्ये बाहेरील व्यक्ती नको, याबाबतीत कोणताही वाद नव्हता. असे असते तर आम्ही चर्चेलाच बसलो नसतो, असे प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी प्रशांत किशोर यांची मोठी चर्चा झाली होती. दरम्यान, आताच्या घडीला जरी प्रशांत किशोर काँग्रेससोबत गेलेले नसले, तरी आगामी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीवेळी प्रशांत किशोर काँग्रेससाठी गेमचेंजर ठरू शकतात, असे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या बैठकीत उर्फी जावेद!
अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ओटीटी’ची स्पर्धक असलेली उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. ती कधी तिच्या ड्रेसमुळे तर कधी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा उर्फी जावेदचे नाव चर्चेत आले असून यावेळी कारण खूपच रंजक आहे. यावेळी ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका बैठकीत दिसून आली.
उर्फी जावेदला तिच्या एका चाहत्याने एक फोटो पाठवला, तो फोटो तीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीत शेअर केला. या फोटोत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बैठक करताना दिसत आहेत. यादरम्यान त्याच्यासमोर एक टीव्ही सुरू असून उर्फी जावेदशी संबंधित बातम्या दाखवल्या जात आहेत. उर्फ जावेद टीव्हीवर नेव्ही ब्लू कलरच्या साडीवर दिसत आहे. उर्फी जावेदने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, योगीजींसोबत या बैठकीला उपस्थित राहून चांगले वाटले. मला कुणी तरी हा फोटो पाठवला, बघून प्रचंड हसायला आले.
लखनऊच्या उर्फीने २०१६ मध्ये टीव्ही शो ‘बडे भैया की दुल्हनिया’ मधील अवनी पंतच्या भूमिकेने करिअरची सुरुवात केली. ५ वर्षांच्या करिअरमध्ये तिने १० टीव्ही शोंमध्ये काम केले आहे. उर्फी जावेदला अभिनयासोबतच नृत्याचीही खूप आवड आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये प्रवेश केल्यानंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे, असे तिचे म्हणणे आहे.
अखिलेश यादव मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून लढवणार
अखिलेश यादव यांनी मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, पत्रकारांना संबोधित करताना अखिलेश यादव म्हणाले की, समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास येत्या काळात २२ लाख तरुणांना आयटी क्षेत्रात रोजगार मिळेल. तर समाजवादी पार्टीचे नेते राम गोपाल यादव यांनी दावा केला आहे की, अखिलेश यादव ‘विक्रमी’ मतांनी विजयी होतील.
भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत गोरखपूर मतदारसंघातून रिंगणात उतरवल्यानंतर आता अखिलेश यादव यांनीही विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अखिलेश यादव यांनी यापूर्वी निवडणूक लढविण्याबाबत सांगितले होते की, पार्टीची इच्छा असेल तर मी निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांनी जिथून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, ती जागा समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो.
बसपाची ५१ उमेदवारांची यादी जाहीर
बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी दुसऱ्या टप्प्यासाठी ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करतानाच मायावती यांनी ‘हर पोलिंग बूथ को जिताना है बीएसपी को सत्ता में लाना है’ हा नारा दिला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील जनता मायावतींना साथ देतात का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
मायावती यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दुसऱ्या टप्प्यातील ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या टप्प्यात 55 जागांवर निवडणुका होत आहेत. त्यापैकी ५१ जागांची ही यादी जाहीर करण्यात आली आहे. इतर चार उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचं मायावती यांनी सांगितलं. मायावती यांनी यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. बसपाने निवडणूक प्रचार सुरू न केल्याबद्दल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सवाल केले होते. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही निवडणूक प्रचार सुरू केला आहे. उमेदवारांच्या याद्याही जाहीर केल्या आहेत, असं मायावती म्हणाल्या.