नाशिक : ओबीसी आरक्षणाच्या निकालाची वाट न पाहता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे. नाशिक महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संख्याबळ सध्या कमी असले तरी यंदाच्या वेळेस मात्र आपल्याला ती भरपाई करावी लागणार असून, जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणावे लागतील. त्यासाठी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काम करावे. राज्यात महाविकास आघाडी सरकारला जनतेची पसंती असून, वरिष्ठ पातळीवर सन्मानजनक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तरीदेखील सर्व जागांवर लढायची तयारी करावी, असे आवाहन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कोर्टात केस दाखल करण्यात आलेली आहे. त्याचा निकाल लवकरच येईल; परंतु त्याची वाट न पाहता इच्छुक सर्व उमेदवारांनी आपापल्या वॉर्डात कामाला लागावे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलून त्या ठिकाणी सक्रिय सदस्याला जबाबदारी देण्यात यावी. शहरातील सर्व सहा विभागांत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येऊन जबाबदारीचे वाटप करण्यात यावे, अशा सूचनाही भुजबळ यांनी केल्या. बैठकीस शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे, अनिता भामरे, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, संजय खैरणार, किशोर शिरसाठ, शंकर मोकळ, मनोहर कोरडे, मुजाहिद शेख, जीवन रायते, मकरंद सोमवंशी, महेश भामरे आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली मते मांडली. यावेळी आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली.
शरद पवारांना एसटी कर्मचाऱयांची काळजी वाटणे स्वाभाविक
गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, अनेक ठिकाणच्या एसटी सेवा अद्यापही ठप्पच आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी कामगारांच्या कृती समितीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर अनिल परब यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर अनेक संघटनांनी या संपातून माघार घेतल्याची घोषणा केली. यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि अनिल परब यांच्यावर केलेल्या टीकेला भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सोडवणे ही महाविकासआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी एसटी संप सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. कोणलाही शरद पवार यांची अॅलर्जी असण्याचे कारणच काय? शरद पवार हे फक्त राज्यातीलच नव्हे तर देशातील अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाला आणि मताला देशात किंमत आहे. याशिवाय, शरद पवार हे महाविकासआघाडीतील एका पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. महाराष्ट्रातील एसटी कामगारांच्या संपाचा तिढा दोन महिन्यांपासून सुटलेला नाही. त्यामुळे शरद पवार यांना कामगारांची काळजी वाटणे साहजिक आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
शरद पवार किंवा मी, आम्ही दत्ता सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत झालेला गिरणी कामगारांचा संप बघितला आहे. हा गिरणी संप संपल्याचे आजवर कोणीही जाहीर केलेले नाही. त्यामुळे गिरण्यांमधील कामगार देशोधडीला लागले. एवढा अट्टाहास करता कामा नये. एसटी कामगारांना समजावण्याचा आणि राज्यकर्ते चुकत असतील त्या त्रुटींवर बोट ठेवण्याचा हक्कही शरद पवार यांना असून, त्यांना काळजी वाटणे साहजिक आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.