…तर राजकारणातून संन्यास घेईन; नवज्योत सिंग सिद्धूंची घोषणा
जालंधर : राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास ५ लाख गरीबांना रोजगार दिला जाईल आणि तसे झाले नाही, तर राजकारण सोडून देईन, असे आश्वासन पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी एका निवडणूक सभेत दिले आहे. फगवाडा येथे काँग्रेस आमदार बलविंदर सिंग धालीवाल यांच्या समर्थनार्थ रविवारी आयोजित एका मोठ्या रॅलीत सिद्धू यांनी ही घोषणा केली. एवढेच नाही, तर त्यांनी पंजाबमधील माफिया राज पूर्णपणे संपुष्टात आणण्यासंदर्भातही भाष्य केले.
भाजपवर निशाणा साधताना सिद्धू म्हणाले, भारतीय जनता पक्षाने ५ वर्षात जालंधरमध्ये कार्यालय उघडले नाही, कारण शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल, हे त्यांच्या नेत्यांना माहीत होते. भाजप ईडीचा धाक दाखवून इतर पक्षांच्या नेत्यांना आपल्या छावणीत सामील करून घेत आहेत, असेही सिद्धू म्हणाले.
नवज्योतसिंग सिद्धू यांनीही शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. यावेळी लोकांना आठवण करून देत सिद्धू यांनी प्रश्न केले, की माता चंद कौर यांची हत्या कुणी करवली? अकाली दलाच्या युथ विंगने आपल्या मुलीसह आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या करत घोषणाबाजी कुणी केली. जालंधरमध्ये जनमेजाजी यांची हत्या कुणी केली?