मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब माध्यमांशी संवाद साधताना विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबरपर्यंत होणार असल्याची माहिती दिली. अधिवेशनाची मुदत वाढवायची की नाही यावर २४ डिसेंबरला चर्चा होणार असल्याची माहिती देखील परब यांनी दिली.
परब यांनी कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडल्यानंतर अधिवेशनासंदर्भात माहिती दिली. अधिवेशन २२ डिसेंबर रोजी मुंबईत होईल. पहिल्या आठवड्यात २२, २३ आणि २४ डिसेंबर असा कार्यक्रम निश्चित झालेला असून दुसऱ्या आठवड्यात २७ आणि २८ डिसेंबर असा कार्यक्रम निश्तित झालेला आहे. अधिवेशनाची मुदत वाढवायची की नाही यावर २४ तारीखला कामकाज सल्लागार समितीची बैठक ठेवण्यात आलेली आहे. त्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित केला जाईल. या अधिवेशनात ११ विधेयकं आणि १ विनियोजन विधेयक अशी एकूण १२ विधेयक मांडली जातील. तसंच, प्रश्नोत्तरं, लक्ष्यवेधी हा जो काही नेहमीचा कार्यक्रम आहे, अशी माहिती ॲड. अनिल परब यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांची तब्येत आणि त्यांना काही दिवस उड्डाण करण्यास परवानगी नसल्यामुळे, तसंच, त्यांना उपस्थित रहायचं असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईत घेण्याचं ठरलं आहे. परंतु, येणारं कोणतं अधिवेशन नागपुरात घेता येईल यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ॲड. अनिल परब यांनी दिली.