देशात कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या घटते आहे. मृत्यूदर ही कमी झाला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर येत आहे. देशात कोरोनाबाधितांची दैंनदिन संख्या 30-35 हजारांच्या आसपास आली आहे. महाराष्ट्रातही हा आकडा आता पाच हजारांच्या आसपास आहे. म्हणजे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचेच चित्र आहे. एकीकडे कोरोनाची लाट ओसरत असताना अनेक निर्बंध शिथील होत आहेत. धार्मिक स्थळे आणि पर्यटन अजून बंद आहेत. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांत देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला. महाराष्ट्र, केरळसारखी राज्ये कोलमडून पडली. आता कुठे जनजीवन पूर्वपदावर यायला लागले आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका रोजंदारी जाण्यात झाला. अशा परिस्थितीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. देशात लसीकरणाचा वेग अतिशय कमी आहे. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांची संख्या कमी आहे. मुलांसाठी तर अजून लसीकरण सुरू झालेले नाही. जगात अनेक ठिकाणी तिसरी, चौथी लाट सुरू झाली असताना भारतात आता तिस-या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना देशात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवण्याची सूचना नीती आयोगाने केली आहे. देशाचे धोरण ठरविणा-या नीती आयोगाचे यापूर्वीचे अंदाज चुकले आहेत. लसीकरण ठराविक वेळेत होईल, इतक्या लसी उपलब्ध होतील, हे दिलेले आकडे किती अवास्तव होते, हे सिद्ध झाले आहे. लसीच्या 216 कोटी मात्रा उपलब्ध होतील, अशी माहिती नीती आयोगाचे आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. व्ही. के. पॉल आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जाव़डेकर यांनी दिली होती. त्यानंतर 24 तासांतच त्यांच्या दाव्याची पोलखोल झाली होती. सीरमच्या सायरस पूनावाला यांनी तर नुकतेच त्यावर कठोर प्रहार केले. काळजी करणे ठीक आहे. धोक्याची जाणीव करून देणेही समर्थनीय आहे. एखाद्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. त्याबाबत ही दुमत असता कामा नये. परंतु, याचा अर्थ लोकांना घाबरून सोडता कामा नये कोरोनाचा केवळ आरोग्यावरच परिणाम झालेला नाही, तर तो सामान्यांच्या मानसिकेतवरही झालेला आहे. त्यातही इशारा देताना तज्ज्ञांची मते घेतली पाहिजेत. शिवाय मे, जूनमध्ये दिलेले इशारे, आताची परिस्थिती आणि संभाव्य स्थिती याचा ताळमेळ घालता आला पाहिजे. एकीकडे काही तज्ज्ञ आता कोरोनाची तिसरी लाट ही पहिल्या दोन लाटांइतकी धोकादायक असणार नाही, असे सांगत आहेत. मुलांचे लसीकरण सुरू झाले नसले, तरी मुलांची प्रतिकारशक्ती लक्षात घेता त्यांना फार धोका नाही, असे काही तज्ज्ञ अधोरेखित करतात. असे असले, तरी कोरोनाचे नियम पाळावेच लागतील. त्याबाबत काहीही दुमत होण्याचे कारण नाही.
राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्था म्हणजे एनआयडीएम या केंद्रीय गृह विभागांतर्गत येणाऱ्या संस्थेने नुकताच एक अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केला आहे. त्यात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यापर्यंत येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 40 जाणकारांच्या सर्व्हेचा निष्कर्ष आहे, की 15 जुलैपासून ते 13 ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट देशात येऊ शकते, तर नीती आयोगाचे आरोग्यविषयक समितीचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनीही पत्रकारांसमोर केलेल्या सादरीकरणात 10 ऑगस्टला हीच माहिती दिली होती. जुलै ते सप्टेंबर दरम्यान तिसरी लाट येऊ शकते आणि त्यासाठी आरोग्यविषयक उपाययोजना काय असायला पाहिजेत याचा त्यांनी केंद्र सरकारबरोबर आढावा घेतला. तिसरी लाट येण्याचा जो कालावधी दिला आहे, त्यापैकी दोन महिने संपले आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत अधिक काळजी घ्यावी लागेल. पॉल यांनी सप्टेंबरपासून तिसरी लाट सुरू होऊ शकते. आणि ही लाट शिखर गाठेल तेव्हा रुग्णसंख्या एका दिवसाला चार ते पाच लाख पर्यंत जाऊ शकते. वाढत्या रुग्णसंख्येसाठी देशभर दोन लाख आयसीयू बेड्स उपलब्ध कराव्या लागतील. याशिवाय 5 लाख ऑक्सिजन बेड्स आणि 10 लाख विलगीकरण बेड्स तयार ठेवावे लागतील, असे त्यांनी सांगितले होते. मागच्या दोन लाटांचा अनुभव जमेस धरून आरोग्य यंत्रणा सतर्क करावीच लागेल. केवळ बेड्स नाहीत, तर ऑक्सिजन आणि अन्य साधनेही उपलब्ध ठेवावी लागतील. आता डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत आहेत. जगात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंत भारताचे प्रमाण जादा आहे. त्यातही महाराष्ट्रात मृत्यू अधिक आहेत. कोरोनाच्या लसीच्या दोन मात्रा घेतल्यानंतरही 87 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे तर अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. दुसरी लाट ओसरत असतानाच भारतातच नाही, तर जगभरात कोरोना विषाणू वेगाने बदलतो आहे. जनुकीय बदलांमुळे नव्याने तयार झालेले आणि अधिक संसर्गजन्य असलेले डेल्टा व्हेरियंट्स जगाला अधिक त्रासदायक ठरत आहेत. त्यातच राज्य सरकारने मॉल्स, बागा, जिम्स यावरचे निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे गर्दी वाढायला लागली आहे. राजकीय कार्यक्रम, आंदोलनाची जी छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत, त्या गर्दीच्या ठिकाणी कोरोनाविषयक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. अशा परिस्थितीत काळजी घेतली पाहिजे. परंतु, इशारा देताना भीती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांच्या मते कोरोना पँडेमिकचे आता एंडेमिक झाले. य़ाचा अर्थ एंडेमिक म्हणजे लाट किंवा उद्रेक संपला आहे असे नव्हे, तर कोरोना विषाणूबरोबर जगण्याची सवय लोकांना होणे आणि शरीराने विषाणूच्या संसर्गाशी जुळवून घेणे हा आहे. देशात डिसेंबर अखेर लसीकरण पूर्ण करण्याच्या घोषणा राज्यकर्त्यांनी पुरेशा अभ्यास नसताना केल्या. परंतु, सध्याच्या गतीने लसीकरण सुरू राहिले, तर लसीकरण पूर्ण व्हायला आणखी सव्वा वर्ष तरी लागेल. डॉ. स्वामिनाथन हे निदर्शनास आणतात. भारत खंडप्राय देश आहे आणि प्रत्येक राज्याची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात कोरोनाविषयीची रोगप्रतिकारक शक्तीही वेगवेगळ्या प्रमाणात असणार आहे. अशावेळी तिसऱ्या लाटेचा धोका नाकारता येत नाही. पण, त्याचे प्रमाण विविध राज्यांत आणि भागांत वेगवेगळे असेल. अख्ख्या देशालाच तिसऱ्या लाटेपासून धोका आहे, असे नाही. काही राज्यांमध्ये मात्र पुन्हा उद्रेक बघायला मिळू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो लहान मुलांमधल्या संसर्गाचा. कारण, तिसऱ्या लाटेत मुलांनाच सर्वाधिक धोका असल्याचे काही डॉक्टरांनी म्हटले होते. परंतु, डॉ. स्वामिनाथन यांनी घाबरण्याची काही गरज नसल्याचे म्हटले आहे. इतर देशांमधला अनुभव आणि अनेक सिरो सर्व्हे पाहिले, तर मुलांना जरी संसर्ग झाला तरी आजाराचे प्रमाण सौम्य असल्याचे आढळून आले आहे. मुलांमधला मृत्युदरही अत्यंत कमी आहे. पण, अनेक देशांमध्ये मुलांसाठी चांगली रुग्णालये नाहीत, सोयी नाहीत. त्याची तयारी मात्र भारताने केली पाहिजे, असे त्या सांगतात. महाराष्ट्राने त्या दिशेने अगोदरच तयारी करून ठेवली आहे, हे चांगले आहे. हृदयविकार किंवा इतर कुठलेही आजार असलेल्या मुलांच्या लसीकरणाला अगोदर सुरुवात केली पाहिजे. शाळा, महाविद्यालये सुरू करताना राज्य सरकारला तिसरी लाट आणि लहान मुलांना असलेल्या संभाव्य धोक्याची जाणीव ठेवावी लागणार आहे.