बावनकुळेंच्या विजयामुळे महाविकास आघाडीला चपराक : फडणवीस
विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार - नवाब मलिक
नागपूर: नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये भाजपानं बाजी मारली आहे. भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव केला. बावनकुळेंच्या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. मी स्वत: विजयी झालो, तेव्हा जितका आनंद मला झाला होता, त्यापेक्षाही जास्त आनंद मला आज झाला आहे, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या. चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय महाविकास आघाडीसाठी चपराक असल्याचं फडणवीस म्हणाले.
तिन्ही पक्ष एकत्र असूनही भाजपचा विजय झाला. राज्यातील जनता भाजपच्या पाठिशी असल्याचं यातून दिसतं. चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय महाविकास आघाडीसाठी चपराक असून भाजपसाठी पुढील विजयाची नांदी आहे, असं फडणवीसांनी म्हटलं. या विजयानंतर बावनकुळे भावुक झाले. त्यांनी फडणवीसांना मिठी मारली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.
चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुले आव्हान
दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं नसतानाही चंद्रशेखर बावनकुळेंनी सबुरीनं, संयमानं काम केलं. मनावर दगड ठेऊन बावनकुळे दोन वर्षे काम करत राहिले. त्याचा फायदा त्यांना झाला, असं पाटील म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडीनं गुप्त मतदान पद्धतीनं घेऊन दाखवावी. मग अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होतो आणि सरकारच्या पाठिशी किती आमदार आहेत ते सरकारला कळेल, असं थेट आव्हान त्यांनी दिलं.
विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार – नवाब मलिक
अकोला आणि नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे हे थांबले पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला आहे त्याचधर्तीवर कायदा झाला पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस वोटींग होत असताना संसदेत पक्षाचा व्हीप असेल त्याप्रमाणे मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे. विधान परिषदेच्या बाबतीतही संसदेत कायदा करण्याची गरज आहे असेही नवाब मलिक म्हणाले. राज्य सरकारला अधिकार असेल तर आम्ही कायदा करू मात्र अधिकार नसेल तर संसदेत केंद्रसरकारने कायदा करुन ही सगळी निवडणूक पारदर्शक व उघडपणे मतदान पध्दतीने झाली पाहिजे. तशाप्रकारची शिफारस केंद्र सरकारकडे करु असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
पराभवावर आत्मचिंतन करु : अतुल लोंढे
विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार करुन विजय मिळवला आहे. मतदारांनी दिलेल्या निर्णयाचा स्वीकार करून पक्ष या पराभवावर आत्मचिंतन करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात लोंढे म्हणाले की, काँग्रेसच्या मतांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. आमचा उमेदवार गरीब होता. भाजपाचा उमेदवार आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होता. भाजपाकडे ९० मते जास्त असतानासुद्धा मतदारांना घेऊन त्यांना राज्याबाहेर पळावे लागले. त्यांना घोडेबाजार करावा लागला, हा खऱ्या अर्थाने भाजपाचा नैतिक पराभव आहे. लोकांमधून होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपाचा पराभव केला.
निवडणुकीत हार जीत होतच असते, काँग्रेस व मित्रपक्षांनी विजयासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले मात्र विजय मिळवण्यात आम्ही कमी पडलो, आम्ही कुठे कमी पडलो? याचे आत्मपरिक्षण करू. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारासाठी काम केलेल्या काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लोंढे यांनी आभार मानले.