मुक्तपीठ

पिंजऱ्यातला वाघ, वाघाची मिशी आणि खोडकर मुलं !

- मुकुंद परदेशी (संपर्क ७८७५० ७७७२८)

वास्तविक पिंजऱ्यात कोंडून ठेवलेला प्राणी, मग ते माकड असो की तो वाघ असो , दयनीयच असतो. केविलवाणाच दिसतो.त्याला त्रास द्यायचा नसतो.त्रास दिला की तो चिडतो, प्रसंगी पिसाळतो सुद्धा. चिडला की तो जास्तच केविलवाणा दिसतो ; पण त्याला कुठे माहीत असतं की चिडल्यावर आपण जास्तच केविलवाणे दिसतो म्हणून ? चिडून चिरकाळलेली डरकाळी ( पिंजऱ्यातल्या वाघाची डरकाळी चिरकाळलेलीच असते !) फोडतांना तो आपले डोळे मिटून घेतो. डोळे मिटले, की त्याचाच पिंजरा त्याला दिसत नाही , मग तो स्वतःला जंगलातला वाघ समजू लागतो. मग तो अजूनच जोरात चिरकाळतो आणि अजूनच जास्त केविलवाणा दिसू लागतो. अशा केविलवाण्या प्राण्यांना चिडविण्यात खोडकर मुलांना वेगळाच आनंद वाटत असतो.

अशाच एका पिंजऱ्यातल्या केविलवाण्या वाघाला बघण्याचा हट्ट मुलांनी वर्गशिक्षक केसरसिंगांकडे धरला. देवा नागपूरकर, चंदू कोल्हापूरकर, आशिष बांद्रेकर ही तशी बरीच खोडकर पण हुशार आणि शहाणी मुलं, त्यामुळे केसरसिंगांची लाडकी. इतर वर्गातली मुलं मात्र या तिघांना दिडशहाणे म्हणत. ( तीन अर्धवट शहाणे म्हणजे दिडशहाणे, या हिशेबाने !) आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांचं मन त्यांना मोडवेना. तसं पिंजऱ्यातल्या वाघाला चिडवायला त्यांनाही मनापासून आवडत असे, पण आपण वर्गशिक्षक आहोत, आपल्याला असा पोरकटपणा करणे शोभणार नाही म्हणून ते गंभीरपणे त्याची थट्टा करीत असत.

वर्गशिक्षक केसरसिंग – मुलांनो, तुम्ही सगळे मागे लागला आहात म्हणून तुम्हाला शरद काकांकडे पिंजऱ्यातला वाघ दाखवायला नेतो, पण तिथे वात्रटपणा करायचा नाही. तुम्ही जरी त्यांना काका म्हणत असलात आणि स्वतःला त्यांचे पुतणे समजत असलात तरी ते काल्पनिक नातं आहे. तुम्ही काही त्यांचे खरोखरचे पुतणे नाहीत, वाट्टेल तो वात्रटपणा करायला , समजलं ? तुमच्यामुळे माझं नाव खराब नको व्हायला.

चंदू कोल्हापूरकर – गुर्जी, पूर्वी या काकांनी एक माकडही पाळलं होतं ना, काकांनी इशारा केला की ते नकला करायचं म्हणे !

वर्गशिक्षक केसरसिंग – सोडलं त्यांनी ते मोकळं नंतर, काही कामाचं नाही म्हणून. वेगवेगळे प्राणी पाळायचा छंद आहे त्यांना. कंटाळा आला की सोडून देतात परत. ते असू देत. फालतू चौकश्या करायच्या नाही, समजलं ?

आशिष बांद्रेकर – बापरे , म्हणजे या वाघालाही एखाद्या दिवशी सोडून देतील का हे काका ?

वर्गशिक्षक केसरसिंग फक्त गालातल्या गालात हसतात.ते सर्व मुलांना घेऊन शरद काकांच्या घरी जातात. अंगणात समोरच पिंजऱ्यात वाघ ठेवलेला असतो. गेटमधून आत जाताच –

चंदू कोल्हापूरकर – (पिंजऱ्याकडे पाहत) मांजर ! मांजर ! मोठ्ठ मांजर !!

वर्गशिक्षक केसरसिंग -( मनातून खुश होत ,पण वरकरणी रागवत ) ऐ चूप. वाघ आहे तो , त्याला राग आला ना तर पंजा मारेल तुला.

देवा नागपूरकर – ( टवाळीच्या सुरात ) पिंजऱ्यातला वाघ कसा पंजा मारेल हो ? पिंजराच लागेल ना त्याच्या पंजाला !

सर्वजण पिंजऱ्याजवळ जातात. कोणी वाघाला खडे मारतो , तर कोणी हळूच त्याची पिंजऱ्यातून बाहेर आलेली शेपटी ओढतो. शरद काका खिडकीतून हे सर्व पाहत असतात , पण ते कोणालाच रागवत नाहीत.

आशिष बांद्रेकर – ते काका बघताहेत सगळं खिडकीतून, पण रागवत नाहीत आपल्याला, असं का ?

देवा नागपूरकर – कंटाळले असतील बहुदा वाघाला.

चंदू कोल्हापूरकर – विचारायचं का त्यांना , आम्हाला देता का हा वाघोबा म्हणून ? आपण करूया दोस्ती या वाघाशी.
इतका वेळ त्रास सहन करणारा वाघ अचानक इसापनीतीतल्या वाघासारखा बोलू लागतो.

वाघोबा – तुम्ही कोण ठरवणार माझ्याशी दोस्ती करायची म्हणून ? मी ठरवत असतो कोणाशी दोस्ती करायची ते !

चंदू कोल्हापूरकर – (टवाळीच्या सुरात) अरे , जा जा. मोठा आलाय दोस्ती करायची की नाही ते ठरवणारा . आम्ही तुझी चेष्टा करत होतो. आम्ही जंगलातल्या वाघाशी दोस्ती करत असतो , पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. तू बरा आहेस आपला शेपटी ओढण्यापूरता.

वाघोबा – (चिरकाळलेली डरकाळी फोडत) मागून शेपटी काय ओढता, हिंमत असेल तर माझ्या मिशीला हात लावून दाखवा.

वर्गशिक्षक केसरसिंगांसकट मुलं खळखळून हसतात. खिडकीत उभ्या असलेल्या शरद काकांच्या चेहऱ्यावरही स्मित हास्य उमटलेले असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button