कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी, पण…!; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच कोरोनावर अनेकांना यशस्वीरित्या मात केली असून अनेक जण उपचारानंतर बरे झाले आहेत. याच दरम्यान आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. तज्ज्ञांनी कोरोनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. देशात आता कोरोनाची तिसरी लाट येणार नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी कोरोना व्हायरस आता महामारी राहिला नसल्याचं म्हटलं आहे. पण जोपर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण होत नाही तोपर्यंत अत्यंत सावध आणि सतर्क असणं गरजेचं असल्याचं देखील सांगितलं.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २६,९६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३८३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल ४,४५,७६८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही राज्यात मात्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
रणदीप गुलेरिया यांनी सर्व लोकांना सण-समारंभाच्या काळात गर्दीपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत थोडी घट होत आहे. कोरोना देशातून पूर्णत: कधीच नष्ट होणार नाही. मात्र देशात वेगाने होणाऱ्या लसीकरणामुळे कोरोनाचा वेग थोडा मंदावताना पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरस हा लवकरच साधा ताप, सर्दी, खोकलासारखा होणार आहे. कारण लोकांमध्ये आता कोरोना विरोधात इम्युनिटी तयार झाली आहे. पण आजारी आणि इम्युनिटी कमी असलेल्या लोकांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका हा असणारच आहे असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
देशातील सर्व लोकांना कोरोना लस देणं हे अत्यंत गरजेचं आहे. काही लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता भासू शकते. पण यावर निर्णय घेतला जाईल. सर्वात आधी सर्वांनी लस घेतली पाहिजे त्यानंतर बूस्टर डोसचा विषय येईल. डिसेंबरपर्यंत सर्वांना लस देण्याचं लक्ष्य असल्याचं डॉक्टर गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच देशासाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील कोविड-१९ चा आर व्हॅल्यू घटून १ टक्क्याच्या आत आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तो १.१७ होता. त्यानंतर १५ सप्टेंबरपर्यंत तो घटून ०.९२ झाला. मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये मात्र अजूनही आर व्हॅल्यू एक टक्क्याच्या आसपास आहे. दिल्ली आणि पुण्यामध्ये आर व्हॅल्यू अजूनही एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत असलेल्या केरळ आणि महाराष्ट्रामधील आर व्हॅल्यूसुद्धा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. ही बाब या दोन्ही राज्यांसाठी दिलासादायक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, वयस्करांच्या तुलनेत कोरोना व्हायरची लागण मुलांना आणि तरुणांना कमी प्रमाणात होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्याचेही समोर येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तसेच तरुणांचा मृत्यूदर देखील कमी आहे. भारतात कोरोना लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. देशात कोरोना लसीचे तब्बल ७५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. तर दुसरीकडे कोरोना लसीकरणासाठी जागतिक आरोग्य संघटनेने भारताचं अभिनंदन करत कौतुक केलं आहे.