राजकारण

त्या पोलिसांचे निलंबन अखेर रद्द; अर्जुन खोतकरांचा रावसाहेब दानवेंना ‘शह’

जालना: जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील पत्रकार गणेश पाबळे हल्ला प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयाची झडती घेतल्याने पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दानवे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली होती. यावरून शिवसेना नेते व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत ही कारवाई चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. हे पोलीस राजकीय बळी ठरले आहेत, असे खोतकर यांनी नमूद केले होते. ही बाब ध्यानात घेत पोलिसांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे आदेश दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

जाफराबाद येथील पत्रकार गणेश पाबळे यांच्यावर वाळू माफियांनी दिनांक ११ जून रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात पाबळे यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले होते. हा हल्ला करणारे हल्लेखोर रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयात लपले असल्याच्या संशयावरून जाफराबाद पोलिसांनी दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन तेथे झडती घेतली होती. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी याबाबत थेट पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याकडे तक्रार केली. पोलिसांनी नाहक आपल्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन तेथे झडती घेतली व कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना धमकावले असल्याचे त्यांनी नमूद केले. तेव्हा पोलीस अधीक्षक देशमुख यांनी पत्रकार गणेश पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई केली नाही व या हल्ल्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोटरे, पोलीस कर्मचारी मंगलसिंग सोळंके, सचिन तिडके, शाबान जलाल तडवी यांना चौकशीविना दिनांक १२ जून रोजी तडकाफडकी निलंबित केले होते. राजकीय अहंकाराचे बळी ठरलेल्या या पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी भीमशक्ती या सामाजिक संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष सुधाकर निकाळजे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक बोऱ्हाटे, माजी आमदार चंद्रकांत दानवे आदींनी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button