नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबरला श्रीक्षेत्र केदारनाथ येथे श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या समाधीचे आणि मूर्तीचे अनावरण होणार आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथ धाम येथे झालेल्या २०० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन, तर २०० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजनही होणार आहे. या कार्यक्रमानिमित्ताने आद्य शंकराचार्यांनी ज्या तीर्थक्षेत्रांना पदस्पर्श केला, तसेच १२ ज्योतिर्लिंग अशा देशभरातील ८२ तीर्थक्षेत्री भारतीय जनता पक्षातर्फे देशव्यापी कार्यक्रम होणार आहेत.
महाराष्ट्रात या निमित्ताने त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ तसेच पंढरपूर, माहूर, कोल्हापूर, तुळजापूर येथे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या ठिकाणी भजन, नाम संकीर्तन, आरती, साधू महंतांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत.
भाजपा प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. तसेच राज्यात होणाऱ्या कार्यक्रमांची ठिकाणे आणि उपस्थित राहणारे मान्यवर याची माहिती मिळालीय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, कपिल पाटील, खा. डॉ. प्रीतम मुंडे त्र्यंबकेश्वरमध्ये उपस्थित असतील. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, डॉ. भागवत कराड, विजयाताई रहाटकर, भाजप प्रदेश सरचिटणीस आ. अतुल सावे, आ. हरीभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, लक्ष्मण औटे पाटील, आध्यात्मिक आघाडी संयोजक संजय जोशी हे श्री क्षेत्रघृष्णेश्वर येथे उपस्थित राहतील.
मोदींच्या केदारनाथ दौऱ्याला विरोध होताच चार धाम देवस्थान बोर्ड बरखास्त?
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी केदारनाथला भेट देणार आहेत. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी तेथील पुजारी (पुरोहित) आणि पंडा समाजाने पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध केला होता. चार धाम देवस्थान बोर्डावर पुरोहित समाजाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. बोर्डाच्या स्थापनेमुळे चार धामसह अन्य ५१ मंदिरांचे नियंत्रण राज्य सरकारकडे आले. उत्तराखंडमध्ये- केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथ हे चार धाम आहेत. जानेवारी २०२० मध्ये त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या सरकारने चार धाम देवस्थान बोर्डाची स्थापना केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त पुजाऱ्यांचे मन वळवण्यासाठी मुख्यमंत्री धामी यांना पुजाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. देवस्थान बोर्ड बरखास्त करण्यासाठी मी स्वतः पंतप्रधानांशी बोलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुजाऱ्यांना सांगितले आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत मंडळ विसर्जित होईल, असे सांगितले जात आहे.
गेल्या चार महिन्यांपासून देवस्थान बोर्ड विरोधात आंदोलन सुरू आहे. यामुळेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना मोदींच्या भेटीच्या एक दिवस आधी केदारनाथला पुजार्यांशी भेट घेऊन, बंद खोलीत जवळपास सात तास पुजार्यांशी चर्चा केली. उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणिक आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध भाजपसाठी चिंतेची बाब आहे.
चार धाम देवस्थान बोर्ड बरखास्त करण्याबाबत उघडपणे सांगितले गेले नाही. मात्र, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री धामी यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी केदारनाथला भेट दिली आणि त्यानंतर पुजाऱ्यांशी चर्चा केली, यावरून स्पष्ट होत आहे की दिल्लीत भाजप नेतृत्वाशी चर्चा करूनच भेटीचा निर्णय घेण्यात आला.