गेल्या ३ महिन्यापासून राज्यात घडत असलेल्या विलक्षण घडामोडीमुळे आपली वाटचाल आता अराजकतेकडे सुरू झाली आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, असे चित्र सध्या तुम्हा-आम्हाला पहावयास मिळत आहे. त्यामुळे एकेकाळी आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले हे राज्य, आर्थिक दिवाळखोरीत निघाल्यास आश्चर्य वाटून घेता कामा नये.
सनदी अधिकाऱ्यांचे बेलगाम वागणे व त्यावर राज्यकर्त्यांचे नियंत्रण नसणे, त्यामुळे प्रशासन चालवणे, दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. ज्या राज्याला बाळासाहेब खेर, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, यासारख्या दिग्गज नेत्यांचे नेतृत्व लाभले ते राज्य,आज प्रशासन कसे नसावे, याचे उत्तम उदाहरण म्हणून नावारूपाला आहे. आज राज्यात जे काही चालले आहे, त्यावरून असं वाटते की जनतेचे सारे प्रश्न मार्गी लागले आहेत. १०० टक्के विकास पूर्ण झाला असून कोरोना, सुशांत, कंगना, पूजा, मनसुख, वाझे, अनिल देशमुख, परमबीरसिंग व आता अनिल परब,एवढेच प्रश्न प्रलंबित आहेत. हातून गेलेल्या सत्तेमुळे हपापलेले व सत्ता टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड करणारे, या दोघांमध्ये सुरू असलेल्या जीवघेण्या संघर्षात रयतेच्या जीवाची घालमेल होत आहे.जगायचे कसे ? आणि आपल्या पोराबळांचे कसं होणार ? या विचाराने सर्वसामान्य माणूस वेडापिसा झाला आहे. पण राज्यकर्त्यांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही,त्यांची कोटी, कोटींची उड्डाणे सुरू आहेत.
कोरोनाचा पुन्हा झालेला उद्रेक, लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र व राज्यात सुरू असलेला जीवघेणा संघर्ष, लॉकडाऊनचे सावट, बेरोजगारी, लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, लहान-मोठे व्यवसायिकांची होत असलेली कुचंबणा, शिक्षणाचा झालेला बट्याबोळ, इ.प्रश्न आ वासून उभे ठाकले असताना, राज्यकर्ते मात्र, रोम जळत असताना फिडेल वाजवणाऱ्या निरोच्या भूमिकेत आहेत.
सत्ता, ही फार वाईट असते, अस म्हंटलं जात. त्याचा पुरेपूर अनुभव सध्या महाराष्ट्रातील जनता घेत आहे. आज तुम्हा-आम्हा सर्वांना जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे. तर राज्यकर्ते मात्र रयतेच्या उरावर बसून बुद्धिबळाचा खेळ खेळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला येणाऱ्या काळात प्रचंड हालअपेष्टाना तोंड द्यावे लागणार आहे.