फोकसशिक्षणसाहित्य-कला

राज्य सरकार छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार

मुंबई : स्वराज्याचे दुसरे छत्रपती असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम, शौर्य आणि त्यागाला अभिवादन करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक गावामध्ये हे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, सरकारच्या या निर्णयाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.

याबाबत घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाचे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांनी आणि मावळ्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान यांचं रक्षण करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं. त्यांनी एकावेळी अनेक शत्रूंचा सामना केला. त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर स्वराज्यातील एक इंज जमीन आणि किल्ला शत्रूच्या हाती जाऊ दिला नाही. ते स्वराज्यासाठी जगले आणि स्वराज्यासाठीच त्यांनी देह ठेवला. संभाजी महाराज स्वराज्यासाठी हुतात्मा झाले. त्यांच्या ऐतिहासिक हौतात्माचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे, भव्य प्रेरणादायी, स्मारक बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार पुढे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील तुळापूर गावात संभाजी महाराजांनी आपला देह ठेवला. अखेरचा श्वास घेतला. तुळापूरपासून जवळच शिरूर तालुक्यात वढू बुद्रुक गावात संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथे त्यांची समाधी आहे. स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांनी ज्या ठिकाणी महाराजांनी आपला देह ठेवला आणि जिथे आपला अखेरचा श्वास घेतला त्या तुळापूर गावाचा आणि जिथे संभाजी महाराजांची समाधी आहे, अशा वढू बुद्रुक गावाचा आणि परिसराचा विकास राज्य सरकारकडून हाती घेण्यात येत आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य,त्याग आणि पराक्रमाचा स्वराज्यभक्तीचा इतिहास सांगणारं जागतिक दर्जाचं स्मारक वढू बुद्रुक गावामध्ये महाराजांच्या समाधीस्थळी राज्य सरकारकडून उभारण्यात येत आहे, अशी माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेकजण तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे येतात. या सर्वांच्यासाठी हे स्मारक केवळ पर्यटन स्थळ असणार नाही. तर हे स्मारक त्यांच्यासाठी प्रेरणादायी स्फूर्तीदायी ठारवं, असा शासनाचा प्रयत्न राहील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button