औरंगाबाद : महागाईविरोधात शिवसेनेच्या या आक्रोशाची ठिणगी संभाजीनगरात पडली आहे. या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली आहे. मराठवाड्यानं महाराष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली आहे. हा इतिहास पाहता आम्ही मराठवाड्याची राजधानी संभाजीनगरातून आम्ही या आक्रोश मोर्चाला सुरुवात केली आहे. ही तर सुरुवात असून या ठिणगीचा वणवा थेट दिल्लीपर्यंत पोहोचेल. या आक्रोशामुळे दिल्लीतील केंद्र सरकारचे तख्तही यामुळे हादरेल, असा इशारा शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी दिला.
महागाईविरोधात आज शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात शहरात भव्य मोर्चा निघाला. प्रत्येक जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढीविरोधात सामान्य जनतेचा हा आक्रोश असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी मोर्चाप्रसंगीच्या भाषणात केले. शहरात आज शिवसेनेने क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला. गुलमंडीवर पोहोचल्यावर संजय राऊत यांनी या आंदोलनामागील शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
गेल्या अनेक दिवसांपासून औरंगबादमध्ये शिवसेनेच्या या मोर्चासाठी तयारी सुरु होती. आज १३ ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात क्रांती चौकातून सेनेच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. महागाई विरोधातील सामान्य जनतेचा हा आक्रोश.. ही आक्रोशाची ठिणगी औरंगाबादेत पेटली असून तिचा वणवा दिल्लीपर्यंत पसरवणार, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला. शहरातील क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा गुलमंडीपर्यंत गेला. तेथे संजय राऊत यांनी जाहीर भाषण करून मोर्चातील भूमिका स्पष्ट केली. या मोर्चात शेकडो शिवसैनिकांसह औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, मंत्री संदीपान भूमरे आदींचा सक्रिय सहभाग होता.
या मोर्चाला शहर पोलिसांची कोणतीही परवानगी नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी ही माहिती दिली असून, या प्रकरणी मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई केली जाईल, असं वक्तव्यही औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांवर या मोर्चाप्रकरणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.