Top Newsराजकारण

पंतप्रधानांची सुरक्षा महत्वाची पण, निवडणुकीत याचे राजकारण नको : भुजबळ

नाशिक : पंजाबमध्ये पंतप्रधानाच्या सुरक्षेकडे राज्याकडून दुर्लक्ष झाल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रत्येक राज्याने पंतप्रधानांच्या सुरक्षेची काळजी घेतलीच पाहिजे. पण, त्याचवेळी या मुद्याचा बाऊ करुन निवडणुकीत राजकारण होऊ नये, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. पंतप्रधानांची काळजी सर्वांनी घेतलीच पाहिजे. पण पंजाब येथील तेथील नेमकी बाजू काय ही ऐकली पाहिजे. ऐनवेळी काही वेळा बदल झाले तर काळजी घेणे अवघड होते.

हेलिकॉप्टरऐवजी कारने जाण्याचे ऐनवेळी नियोजन बदलेले गेले. दुसरी बाब म्हणजे पंजाबच्या शेतकर्‍यांत केंद्र शासनाविरोधातील आंदोलनामुळे रोष आहे. राज्याने साडेसातशे शेतकरी गमावले आहेत. अचानक हेलिकॉप्टरचा दौरा रद्द होणे आणि शेतकर्‍यांच्या मनातील उद्रेक या दोन गोष्टीमुळे प्रकार घडला. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते असे नाही. अशा दोन्ही बाजू असून दोन्ही बाजूने काळजी घेतली जावी.

चंद्रकांत पाटील मोदींच्या पुण्याईने निवडून आले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंचा फायदा होतो. त्यांनी हिंमतीवर आमच्यापेक्षा जास्त आमदार निवडून आणलेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटीलदेखील पुण्यातून निवडून येतात. पण, ते मोदींच्या यांच्या पुण्याईवर, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

आव्हाड यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सध्या वादळ उठले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भुजबळ यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली. आव्हाड यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेल्याचे सांगत भुजबळ यांनी आव्हाड यांचे म्हणणे खोडून काढले.

भुजबळ पुढे म्हणाले, दि. बा. पाटील, दत्ता पाटील, पांडुरंगराव गायकवाड, जी. जी. चव्हाण, जनार्दन पाटील, लालूप्रसाद हे सगळेच लढतच होते. आज ओबीसी विद्यार्थ्यांसाठी अनेक नेत्यांचं काही ना काही काम सुरूच आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड तसं नेमकं का बोलले मला माहीत नाही. ते त्यांनाच विचारायला हवे, असे भुजबळ म्हणाले. इतर समाजांप्रमाणे ओबीसी समाज चवताळून उठत नाही. तसे व्हावे, अशी आव्हाड यांची अपेक्षा असावी. त्यांनी वापरलेले शब्द कुणाला रुचले नसतील, ते समजण्यासारखे आहे. मात्र, याचा अर्थ त्यांची भूमिका ओबीसीविरोधी आहे असे नाही.

ओबीसींनी लढायला शिकले पाहिजे, असा त्यांचा हेतू असावा, असे भुजबळ म्हणाले. देशभरात ओबीसी ५४ टक्के आहेत. महाराष्ट्रात ओबीसींची संख्या सहज साडेसहा-सात कोटी होते. आज राजकीय क्षेत्रातल्या ओबीसींच्या एकूण ११ लाख जागा अडचणीत आल्या असतील, तर त्यासाठी आवाज मोठा व्हायला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button