जनता आणि सरकार बेफिकीर राहिल्यानेच कोरोनाची दुसरी लाट : मोहन भागवत
नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरोनाची दुसरी लाट येण्यामागे जनता आणि सरकारच्या बेफिकिरीला जबाबदार धरले आहे. मात्र, आता नागरिकांनी पॉझिटिव्ह राहूनच या संकटाचा मुकाबला करायला हवा, असंही मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं आहे.
‘पॉझिटिव्ह अनलिमिटेड’ या कार्यक्रमाला मोहन भागवत मार्गदर्शन करत होते. पहिल्या लाटेनंतर सरकार आणि जनता बेफिकीर झाली होती. आता आपल्याला पॉझिटिव्ह राहावं लागेल. स्वत: कोविड निगेटिव्ह ठेवण्यासाठी सावधान राहावं लागणार आहे. तसेच सध्याची परिस्थिती पाहता तर्कहिन वक्तव्येही टाळावी लागणार आहेत. ही परीक्षेची वेळ आहे. मात्र, सर्वांना एकजूट राहावे लागेल. एक टीम म्हणून काम करावे लागेल, असं भागवत यांनी सांगितलं.
कोरोना संकटात यश येणं आणि अपयश येणं हा शेवट नाही. आपल्याला प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सरकार, प्रशासन आणि जनता बेफिकीर झाले होते. त्यामुळे आपण या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण घाबरून जाऊ नका. आपण स्वत:ला तयार केलं पाहिजे, असं ते म्हणाले.
कोरोना हे मानवतेवरील संकट आहे. आपल्याला या संकटाचा सामना करून जगासमोर उदाहरण निर्माण करायचं आहे. एकमेकांचे गुणदोष काढण्यापेक्षा एक टीम म्हणून काम केलं पाहिजे. गुणदोष काढण्याचं काम नंतरही करता येईल. मात्र, सध्या टीम म्हणून काम करत या संकटावर मात करायला हवी, असंही त्यांनी सांगितलं.