मुंबई: शहरातील रस्त्यांच्या दर्जाबाबत आक्षेप घेत हायकोर्टात भाजपचे मुंबई महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. या सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सांगितलं की, मुंबईत सध्या सर्वत्र विकासकामं सुरू आहेत. मी ज्या महानगरातून, कोलकात्यातून आलो आहे त्यापेक्षा मुंबईतील रस्त्यांची स्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. त्यामुळे येथील रस्त्यांना उगाच नावं ठेऊ नका. तसेच तर निवडणुकीच्या तोंडावर हायकोर्टाचा राजकीय आखाडा करू नका, याशिवाय याचिकेत कोणत्याही कंत्राटदाराला प्रतिवादी न केल्याबद्दलही मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्ते प्रभाकर शिंदे यांना खडे बोल सुनावले. याचिकेत एकाही कंत्राटदाराला तुम्ही प्रतिवादी केलेले नाही तरीही तुम्ही कंत्राटदाराच्या नावाने खडे फोडताय?, हे चालणार नाही असंही हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना सुनावत शिंदे यांची याचिका फेटाळून लावली.
खराब रस्त्यांबाबत मुंबई महापालिकेच्या रस्ते कंत्राटदारांना जबाबदार ठरवत त्यांना देण्यात आलेल्या कंत्राटांचं तसेच त्यासाठी राबवण्यात आलेल्या निविदांचं ऑडिट करण्याचा मागणी शिंदे यांनी या याचिकेतून हायकोर्टाकडे केली होती. मुंबईतील रस्त्यांवर प्रचंड खड्डे असून त्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करत पालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. पालिका प्रशासन रस्त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही खबरदारी न घेता ‘ब्लॅक लिस्टेड’ कंत्राटदारांना ते काम सोपवत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.
याचिकाकर्त्यांच्या या युक्तिवादानानंतर मुख्य न्यायमूर्तींनी त्यांना चांगलंच फैलावर घेतले. मुख्य न्यायमूर्ती म्हणाले की, ‘तुम्ही स्वतः नगरसेवक आहात तुमचे प्रश्न पालिकेत मांडण्याऐवजी आमच्याकडे का आलात? खराब रस्त्यांचा नागरिकांना त्रास होत असेल तर त्यांनी कोर्टात येऊन याचिका करायला हवी त्यांच्या जागी तुम्ही का इथे येता? त्यामुळे याचिकेमागचा तुमचा नेमका उद्देश काय? अशा प्रश्नांची सरबत्तीच न्यायमूर्तींनी केली. इतकेच नव्हे तर पावसाळ्यातील खड्यांचे फोटो दाखवल्याप्रकरणीही याचिकाकर्त्यांना खडसावले. पावसाळ्यातले फोटो आत्ता दाखवू नका. मुंबईतील रस्त्यांची अवस्था सध्या चांगली असून तुम्ही पावसाळ्यात हे आमच्या निदर्शनास हे आणायला हवे होते असंही मुख्य न्यायमूर्ती म्हणाले. याशिवाय आतापर्यंत किती लोकांनी खराब रस्ते व खड्ड्याबाबत तक्रार केली आहे?, याची माहिती द्या. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तर देता न आल्यानं हायकोर्टानं याचिका फेटाळून लावली.