महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा धोका वाढला; विषाणूचे तीन प्रकार आढळले
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण होत आहे. आता दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या ही ५ ते ६ हजारांच्या आसपास असल्याचं समोर येत आहे. ही आकडेवारी जरी जास्त असेल तरी गेल्या काही दिवसांपूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत खूपच कमी आहे. मात्र, असे असले तरी आता चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या तीन वेगवेगळ्या विषाणूंनी तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. तज्ज्ञांच्या मते, डेल्टा प्लस व्हेरिएंटचे नवं रूप इतकं खतरनाक आहे की याच्या संक्रमण दराच्या संदर्भात अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
अलीकडेच व्हायरसच्या जीनोम सिक्वेंसींगमध्ये असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे एकूण ६६ रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंट ग्रुपचे तीन वेगवेगळे प्रकार आहेत. Ay.1, Ay.2 आणि Ay.3 . आता तज्ज्ञांनी डेल्टा प्लस विषाणूच्या आणखी १३ उप-वंशांचा शोध लावला आहे जो Ay.1, Ay.2 आणि Ay.3 पासून सुरू होतो आणि १३ पर्यंत आहे. डेल्टा व्हेरिएंटमध्ये म्युटेशन झाल्यावर डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार होतो.
राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६६ वर पोहोचली आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे जळगाव जिल्ह्यात असून त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ६६ डेल्टा प्लस रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३४ स्त्रिया आहेत.