मुक्तपीठ

तेलाचा सुकाळ, पाण्याचा दुष्काळ

- भागा वरखडे

गेल्या काही दिवसांपासून इतक्या वेगवान घडामोडी होत आहेत, की इराणमधील लोक रस्त्यावर उतरून संघर्ष करीत असल्याचे जगाच्या लक्षातच आलेले दिसत नाही. इराणमधील लोकांच्या दोनच प्रमुख मागण्या असून, त्या जीवन मरणाशी निगडीत आहेत. इराणमध्ये कच्चे तेल मोठ्या प्रमाणात सापडत असून, त्याच्या निर्यातीवर इराणची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. कच्चे तेल भरपूर; परंतु पिण्यासाठी पाणी नाही, अशी सध्या इराणची अवस्था आहे. भारताला धान्याच्या बदल्यात तेल देणारा आणि रुपयांत विनिमय करणारा हा एक सच्चा मित्र होता. अलीकडच्या काळात चीनने तिथे कुरघोडी केली असली, तरी चाबहार बंदराचा भारताने विकास करून दिला आहे. असा हा भारतमित्र देश सध्या पाण्याच्या अभूतपूर्व संकटामुळे चांगलाच अडचणीत आला आहे. जागतिक हवामान बदल हे पाणीटंचाईचे कारण आहेच; परंतु भारतासह जगातील अनेक देशांनी भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी न केलेल्या शास्त्रोक्त प्रयत्नांची किंमत जशी मोजावी लागते, तशीच किंमत आता इराण मोजतो आहे. केवळ पाणीटंचाईच नाही, तर इराणला आता विजेची टंचाई जाणवते आहे. विजेची टंचाई इतकी आहे, की या देशाची राजधानी असलेल्या तेहराणसह अन्य शहरांत पथदिवे चालत नाहीत. दुष्काळ, तीव्र उन्हाचे चटके यामुळे इराणमधील नागरिकांचे जीणेच हराम झाले आहे. पाणी आणि वीज या दोन प्रश्नांवर जनता रस्त्यावर आली असून, आता जगाचे ती लक्ष वेधून घेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणतज्ज्ञ आणि हवामानविषयक अभ्यासक इराणला या संकटाची जाणीव करून देत होते. वेळीच एक धागा घातला नाही, तर कपडाच फाटतो, तशी अवस्था आता इराणची झाली आहे. आपल्याकडे हवामान विभाग, जपानची नोमुरा नावाची संस्था, तसेच स्कायमेट नावाची खासगी संस्था जसे हवामानाचे अंदाज व्यक्त करतात, तसाच अंदाज एप्रिलमध्ये इराणच्या हवामान खात्याने व्यक्त केला होता आणि त्यात दुष्काळाच्या संकटाचा इशारा दिला होता. तो आता प्रत्यक्षात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशा-याची किंमत आता इराण मोजतो आहे. पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. अगोदरच भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने तिथे अगोदरच पाणीपातळी खालावली आहे. त्यातच या वर्षी पाऊस अतिशय कमी झाल्याने पाण्याची पातळी आणखीच खालावली आहे.

खुजेस्तान हा इराणमधील तेल उत्पादन करणारा प्रदेश. या प्रदेशात लोक पाणी टंचाईविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. इतर शहरांमध्ये जल विद्युत टंचाईविरोधातही निदर्शने करण्यात येत आहेत. वाढत्या आंदोलनामुळे अखेर सरकारला वीज आणि पाणी टंचाईची सर्वाधिक झळ बसलेल्या भागांमध्ये आपत्कालीन मदत पोहोचवावी लागली. इराण सध्या तापमानवाढ, प्रदूषण, पूर, कोरड्या पडत असलेल्या नद्या, अशा वेगवेगळ्या पर्यावरणविषयक समस्यांचा सामना करत आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार इराणच्या प्रमुख नदीपात्रात सप्टेंबर 2020 ते जुलै 2021 दरम्यान झालेला पाऊस हा गेल्या वर्षी याच काळात पडलेल्या पावसापेक्षा खूप कमी होता. इराणच्या पावसाची वर्षनिहाय आकडेवारी उपलब्ध न झाल्याने नेमका परिणाम शोधता येत नाही. असे असले, तरी अमेरिकेच्या अभ्यासकांनी उपग्रहाच्या माध्यमातून डेटा एकत्रित केला आहे.यात मार्चमध्ये झालेल्या पावसाची गेल्या 40 वर्षांतल्या पर्जन्यमानाच्या सरासरीशी तुलना करण्यात आली. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अरविन के सेंटर फॉर हायड्रोमेटेरोलॉजीनुसार 2021 च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांची आकडेवारी त्या सरासरीपेक्षा खूप कमी होते. संयुक्त राष्ट्रांच्या खाद्यान्न आणि कृषी संघटनेनुसार इराणची एक तृतीयांश जमीन शेतीखाली आहे. एवढ्या मोठ्या शेतजमिनीसाठी सिंचनाची सोय गरजेची आहे; पण पर्जन्यमानात होत असलेली घसरण कायम राहिल्यास इराणच्या शेतीसाठी हे एक मोठे संकट ठरू शकते. इराणला त्यातही तेलसमृद्ध असलेल्या खुजेस्तान भागाला दुष्काळ नवीन नाही; परंतु या वर्षीच्या दुष्काळाने तिथली जनता तहानलेली आहे. पाण्याअभावी घसा कोरडा झालेली ही जनता आता रस्त्यावर उतरली आहे. भारतात जशा बारमाही नद्या आता चारमाही झाल्या आहेत. काही नद्या तर पावसाळ्यातरी कोरड्याच राहायला लागल्या आहेत. जादा पावसाच्या प्रदेशात कमी पाऊस आणि कमी पावसाच्या प्रदेशात जादा पाऊस हे आता समीकरण झाले आहे. तेच आता इराणमध्ये होत आहे. स्टुटगार्ट विद्यापीठातील संशोधकांच्या डेटानुसार एक असा भाग जिथे कायम मुबलक प्रमाणात पाणी असायचे, तिथली अत्यंत महत्त्वाची ‘करूण’ नदी सध्या कोरडीठाक पडली आहे. या नदीच्या पाणी पातळीत गेल्या काही वर्षात झपाट्याने घट झाल्याचे उपग्रह छायाचित्रावरून स्पष्ट दिसते.

अनेक महत्त्वाच्या धरणांची पाणी पातळी कमी झालेली आहे; मात्र धान उत्पादक शेतकरी आणि पशुपालन करणाऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याची मागणी होते आहे. तेल उद्योगाचा स्थानिक इकोसिस्टिमवर विपरित परिणाम झाल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इराणच्या मध्यभागी असलेल्या वाळवंटी प्रदेशासही याच भागातून पाणी पुरवठा केला जातो. आपल्या भागातून इतर भागाला पाणीपुरवठा करण्याला सर्वाधिक विरोध होतो, तसाच विरोध आता इराणमध्येही आहे. इराणच्या मध्य भागातून अन्य भागात पाणी न्यायला विरोध केला जात आहे. येल विद्यापीठातील इराणी पर्यावरण विभागाचे माजी उप-प्रमुख कावेह यांच्या म्हणण्यानुसार हवामान बदल आणि दुष्काळ हे यामागचे कारण आहे. ही आजची समस्या नाही. गेल्या अनेक दशकांपासून ही समस्या मूळ धरत होती. व्यवस्थापनाचा भोंगळ कारभाळ, पर्यावरण व्यवस्थेकडे झालेले दुर्लक्ष, दूरदर्शितेचा अभाव आणि या परिस्थितीसाठी तयार नसणे यामुळे इराणमध्ये अचानक तणावाची परिस्थिती तयार झाली आहे. इराण आटत चाललेल्या पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून आहे. इथे गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाची समस्या भेडसावते आहे. त्यातच हवामान बदलामुळे इराणला अधिक बिकट संकटाचा सामना करावा लागतो आहे. वाढती उष्णता आणि दुष्काळ यांचा जल विद्युत निर्मितीवर विपरित परिणाम होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इथे मोठ्या प्रमाणावर भारनियमन केले जात असल्याने नागरिक अधिकच संतप्त झाले आहेत. विजेअभावी टेलिकम्युनिकेशन व्यवस्था कोलमडून पडली आहे. सिग्नल यंत्रमा कोलमडून पडल्याने वाहतूक नियमन करता येत नाही. उन्हाळ्यात वातानुकुलन यंत्रणेचा वापर वाढत असताना वीजच नसल्याने लोक सैरभैर झाले आहेत. त्यातही विजेच्या जादा मागणीमुळे पाॅवर ग्रीड बंद पडत आहेत. इराणमधल्या अपुऱ्या वीज पुरवठ्यासाठी क्रिप्टो-करंसीच्या मायनिंगवरही आरोप झाले. यासाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होत असल्याचे सांगितले जाते. इराणने पाणी संकटावर उपाय शोधला नाही, तर लाखो लोक सामूहिक स्थलांतर करतील, असा इशारा 2015 साली एका पर्यावरणतज्ज्ञाने दिला होता; परंतु या इशा-याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. देशात ‘कृषी क्रांती’ची गरज असल्याचे इराणचे पर्यावरण विभागप्रमुख मासूमेह एब्तेकार यांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button