मुंबई : क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर २५ दिवसानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळाला आहे. तीन दिवस दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. उद्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त होईल. त्यानंतर उद्या किंवा शनिवारी हे तिघे कारागृहाबाहेर येतील. दरम्यान, आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना जोरदार टोला लगावलाय. तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जायला घाबरतोय, अशी टीका मलिक यांनी वानखेडेंवर केलीय.
मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज आर्यन खानसह तीन आरोपींना जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी कालच दोन आरोपींना एनडीपीएस विशेष न्यायालयाने जामीन दिला होता. ज्या प्रकारे फर्जी प्रकरण बनवण्यात आलं, सुरुवातीलाच न्यायालयात त्यांना जामीन मिळाला असता. मात्र प्रत्येक वेळी आपल्या वकिलांद्वारे एनसीबी आपली भूमिका बदलते. त्यांचा प्रयत्न असतो की लोकांना जास्त काल जेलमध्ये कसं ठेवण्यात येईल. लोकांच्या मनात भीती कशी निर्माण करता येईल. ज्यांनी हे फर्जी प्रकरण बनवलं त्यांच्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ, जे पुरावे आहेत ते सादर करु, असं मलिक म्हणाले.
समीर वानखेडेंना मलिकांचा इशारा
योगायोग म्हणावा लागेल की, ज्या अधिकाऱ्यांना यांना जेलमध्ये टाकलं. तोच अधिकारी आज जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी हायकोर्टात गेला. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणी जो तपास करत आहे तो तपास सीबीआय कडून करण्यात यावा अशी मागणी त्याने केलीय. मुंबई पोलिसांनी सांगितलं की त्यांना अटक करण्यापूर्वी ७२ तासांची नोटीस दिली जाईल. तुरुंगात टाकणारा आज तुरुंगात जाण्याला घाबरतोय. मला वाटतं की जो फर्जीवाडा त्यांनी केलाय तो आता समोर येत आहे, अशी टीकाही मलिक यांनी केलीय.
निकाहनामा खरा… समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. वानखेडेंचा पहिला निकाह लावणाऱ्या मौलाना मुझम्मील अहमद यांनी केलेल्या दाव्यांमुळे प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. निकाहावेळी समीर वानखेडे आणि शबाना दोघेही मुस्लिम होते. समीर मुस्लिम नसते, तर मी त्यांचा निकाह लावलाच नसता, असा दावा त्यांनी केला आहे. यावर समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांनी देखील निकाहनामा खरा असल्याचं सांगितलं. तसेच लग्नानंतर घरी तुम्ही हिंदू की मुस्लिम चालीरीतीनुसार संसार करत होता असा प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. तसेच समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद आहे का, यावर देखील शबाना यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.
ठाकरे, पवारांच्या इशाऱ्यावर मलिकांकडून वानखेडेंची बदनामी; भाजपचा आरोप
समीर वानखेडे यांची बाजू घेत भाजपकडून मलिकांसह महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांवर टीका करण्यात येत आहे. यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सांगण्यावरून नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर टीका करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला असून, समीर वानखेडे यांच्या पत्नीशी माझे बोलणे झाले आहे. ते आणि त्यांचे सासरे मला भेटायला येणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. आम्ही घोटाळेबाजांना सोडणार नाही. आयकर विभागाला अनेक गोष्टी सापडल्या आहेत, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.
समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. जात काढली जाते, बाप काढला जातो, हे चुकीचे असून, ठाकरे सरकार चुकीचे वागत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना हे शोभत नाही. नवाब मलिक यांनी कोर्टात जावे. कोर्ट काय तो निर्णय घेईल. तुम्ही दिशाभूल का करत आहात, अशी विचारणा करत तुमचे घोटाळे बाहेर काढल्यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी समीर वानखेडेंना टार्गेट केले जात आहे, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.
क्रांती रेडकरचे उद्धव ठाकरेंना पत्र
समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच थेट पत्र लिहिले आहे. यामध्ये तिने शिवसेनेच्या राज्यात एका महिलेच्या प्रतिष्ठेसोबत खेळ खेळला जात आहे, आज बाळासाहेब असते तर त्यांना हे अजिबात सहन झाले नसते, असे म्हटले आहे. आमचा लोकांसमोर दररोज अपमान होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीच्या प्रतिष्ठेशी खेळले जात आहे. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांना ते आवडले नसते. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. मला आतापर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही, मी उत्तराची वाट पाहत आहे, असे क्रांती रेडकर म्हणाली.
पत्रात म्हटलेय की, शिवसेनेला मराठी माणसासाठी लढताना पाहत मी मोठी झाली आहे. मी मराठी मुलगी आहे. बाळासाहेब, शिवाजी महाराजांकडून शिकले की, कोणावर अन्याय करू नका, स्वत:वर अन्याय झाला तर सहन करू नका. त्याच ताकदीवर मी आज एकटी माझ्या खासगी आयुष्यावर हल्ला करणाऱ्या लोकांविरोधात मजबुतीने उभी आहे आणि लढत आहे.
सोशल मीडियावर लोक केवळ मजा पाहत आहेत. मी एक कलाकार आहे, राजकारण मला समजत नाही आणि त्यात पडायचे देखील नाही. आमचा काही संबंध नसताना रोज सकाळी आमची इज्जत चव्हाट्यावर मांडली जात आहे. शिवसेनेच्या राज्यात असे होत आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे अजिबात आवडले नसते, असे क्रांती रेडकरने म्हटले आहे.
एक महिला आणि तिच्या कुटुंबावर खासगी स्तरावर हल्ले होत आहेत, हे खालच्या पातळीवरील राजकारण आहे. आज बाळासाहेब ठाकरे नाहीत, पण त्यांची सावली आम्ही तुमच्यात पाहतो. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही. मराठी असल्याने मी तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहे, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही न्याय करावा, अशी अपेक्षाही क्रांती रेडकरने व्यक्त केली आहे.
चित्र वाघ यांचा नवाब मालिकांना सवाल
नवाब मलिक हे सातत्याने समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे, वानखेडे कुटुंबीयही मैदानात उतरले असून पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना इशाराच दिला आहे. दरम्यान, यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीमधील मंत्री नवाब मलिक हे एका महिलेची कौटुबीक विषयाबाबतची बदनामी करताना दिसत आहेत. ते काझी म्हणतायत की त्यांच्याजवळ असलेली कादगपत्रे खरी आहेत. त्याची शाहनिशा न्यायालयीन प्रक्रियेमधून होऊ शकते. परंतु अशा पद्धतीनं महिलेच्या वैयक्तिक आयुष्याचा माध्यमांसमोर बाजार मांडण्याचा अधिकार नबाव मलिक यांना कोणी दिला, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
एका ट्वीटवरून गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्रीदेखील उघडपणे महिलेची होत असलेली वैयक्तिक बदनामी ऐकताना पाहतानादेखील गप्प कसे काय? यावरू एक गोष्ट सिद्ध होते, ज्या काँग्रेसी प्रवृत्तीने डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचा साम-दाम-दंड-भेद वापरून निवडणूकीत पराभव केला होता, ती काँग्रेसी प्रवृत्ती जेव्हा सत्तेवर येते तेव्हा दलित आणि शोषितांवर अन्याय झालेला पाहायला मिळतो, असंही त्या म्हणाल्या.
नवाब मलिक यांनी मांडलेल्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी : जयंत पाटील
नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत असून हे प्रकरण नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि नागरीकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. दापोली येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणी भाष्य केलं.
शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत घडलंय आणखी इतरांच्या बाबतीतही झालं असेल. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. एनसीबीची टीम वानखेडेंच्या चौकशीसाठी आली आहे. वानखेडेची चौकशी करतेय. वानखेडे यांनी घेतलेला दाखला व आयआरएसमध्ये जो प्रवेश घेतला तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला याची माहिती लवकरच समोर येईल आणि फसवणूक कुणी केली व कशी केली याचा खुलासादेखील लवकरच होईल. चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल. त्यामुळे ही टीम चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आली नसावी, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. नवाब मलिक हे सत्य गोष्टी समोर आणत आहेत. केंद्राच्या या यंत्रणा चुका करुन दिशाभूल करत आहेत. या यंत्रणांचा वापर करून नागरिकांना छळण्याचा प्रकार होतोय, असेही पाटील म्हणाले.