राजकारण

हे सरकार पाडणारा जन्माला यायचाय!; फडणवीसांना अजित पवारांचे उघड आव्हान

पंढरपूर : राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे नमूद करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समचार घेतला. ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय?, हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे, हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही’, अशा शब्दांत अजित पवार यांनी फडणवीस यांना आव्हान दिले. फडणवीस यांनी सभेत अजित पवार यांची नक्कल केली होती. त्यावरूनही अजित पवार भडकले. आपण कोणाच्या भानगडीत नसतो. त्यामुळे आपला नाद कोणी करायचा नाही आणि केलाच तर… असे म्हणत सूचक इशाराच अजित पवार यांनी दिला.

पंढरपूर येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली. यावेळी अजित पवार बोलत होते. आजवर अजित पवार यांनी फडणवीस यांच्यावर इतक्या थेट शब्दांत कधी टीका केली नव्हती. मात्र, आजची राष्ट्रवादीची सभा ही फडणवीसांच्या सभेला उत्तर देणारी सभा ठरली. या सभेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार या सर्वांच्याच भाषणाचा रोख हा फडणवीस यांच्या वक्तव्यावर होता.

शरद पवार यांच्या पावसात भिजण्यावर केलेल्या वक्तव्याचाही अजित पवार यांनी समाचार घेतला. तुम्ही कोठे आणि साहेब कोठे असे म्हणत अजित पवार यांनी फडणवीस यांना टोला हाणला. चंद्रकांत पाटील यांनाही अजित पवार यांनी लक्ष्य केले. ‘चंपा’ असा पुन्हा एकदा उल्लेख करत ‘ते उद्या येथे येऊन काहीही सांगतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे अजित पवार म्हणाले.

विरोधी पक्षनेते पाच वर्षे राहणार का?

मंगळवेढ्यात ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न केंद्राचे पैसे आणून सोडवतो, असे फडणवीस म्हणाले होते. त्या विधानाचा जयंत पाटील यांनी समाचार घेतला. या ३५ गावांना पाणी द्यायला आम्ही समर्थ आहोत. केंद्र सरकार जे पैसे देते ते राज्याकडून मिळणाऱ्या करातूनच देत असते. तो पैसा आमच्या हक्काचा आहे, असे पाटील म्हणाले. सध्या एकजण आमदार देता का आमदार म्हणत सर्वत्र फिरत असला तरी हे सरकार १७० आमदारांच्या पाठिंब्यावर उभे असल्याने या सरकारला काहीही होणार नसल्याचेही जयंत पाटील म्हणाले. आमचे सरकार पाच वर्षे टिकणार असून ते पाच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून राहणार का? हाच खरा प्रश्न असल्याचा टोला पाटील यांनी हाणला.

नारायण राणेंसारखी गट फडणवीसांची झाली

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेरोशायरी करीत सभेत जोरदार टाळ्या मिळवल्या. ‘सुरुवातीला ‘ते’ प्यार का वादा, फिफ्टी फिफ्टी म्हणत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भुलवयाला आले होते, पण चाणाक्ष शरद पवार यांनी परिस्थिती हेरत अमर, अकबर, अँथनी म्हटले आणि हे भक्कम सरकार बनले, असे पाटील म्हणाले. सरकार पडणार असे आधी नारायण राणे यांना स्वप्न पडायचे, आता तीच गत फडणवीस यांची झाल्याचा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला. फडणवीस यांच्यामुळेच आयुष्यात पहिल्यांदा राष्ट्रवादीसाठी मते मागायची संधी मला मिळाल्याचेही पाटील बोलले.

काय म्हणाले होते फडणवीस?

मंगळवेढ्यातील सभेत ‘अरे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा’, असे विधान करत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले होते. हे महावसुली सरकार आहे. या सरकारचा अन्याय, दूराचार आणि भ्रष्टाचार रोखण्याची व हे सरकार चालवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील नागरिकांना मिळाली आहे, ती दवडू नका, असेही फडणवीस म्हणाले होते. त्याचा अजित पवार यांनी समाचार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button