शिक्षण

केरळमध्ये रुग्णसंख्या वाढली; ११ वी ची परीक्षा घेण्यास सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दीड वर्षानंतर देशात काही राज्यांनी शाळा सुरू केल्या आहेत. १२ राज्यांमध्ये शाळा उघडल्यापासून मुलांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात, आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पुन्हा एकदा कोविड नियमांचे कठोर पालन करण्याचे आदेश जारी केले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता गृह विभागानेही सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यात, आता केरळमधील वाढत्या रुग्णसंख्येची सुप्रीम कोर्टानेही दखल घेतली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील काही राज्यांमध्ये शाळा सुरू होऊन सुमारे एक महिना उलटला आहे. त्यामध्ये पंजाब अव्वल आहे कारण तिथे सर्वांत आधी शाळा सुरू झाल्या. त्यानंतर बिहारमध्ये १५ ऑगस्टनंतर शाळा सुरू झाल्या. दरम्यान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगडमध्येही मुले शाळेत जाऊ लागली आहेत. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णसंख्या लक्षात घेता अद्यापही शाळा सुरू केल्या नाहीत.

या आठवड्यात कोरोनाचे दररोज ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये निम्म्याहून अधिक रुग्ण हे केरळ राज्यातील आहेत. त्यामुळेच, तुर्तास केरळमधील ११ वीच्या परीक्षा घेण्यास सुप्रीम कोर्टानेही नकार दिला आहे. १३ सप्टेंबर रोजी याप्रकरणी अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे. दरम्यान, केरळमध्ये ६ सप्टेंबरपासून ११ वीच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. केरळमधील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, परीक्षा घेणं हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळेच, या परीक्षा न घेण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button