मुंबई : भारतीय हवामान विभागाने सांगितलं की, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे दक्षिण पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विभागाने बुधवारी या भागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस किंवा विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि मराठवाडा भागात तसंच मुंबईत येत्या २४ तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवारी संध्याकाळी ही माहिती दिली. आयएमडी मुंबईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस होसाळीकर म्हणाले, गुलाब चक्रीवादळाचा उर्वरित प्रभाव मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात कायम राहील आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात बुधवारी अधिक पाऊस पडेल. अत्यंत मुसळधार पाऊस म्हणजे २४ तासात २०४.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस होणं. ते म्हणाले, गुलाब चक्रीवादळाचे आता कमी दाबाचे क्षेत्र आहे. याची अरबी समुद्राच्या दिशेने वाटचाल होताच, गुरुवारपासून महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव कमी होईल.
हवामान खात्याने शहरे आणि शहरांच्या सखल भागात पाणी साचण्याची आणि पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. सोबतच मच्छीमारांना गुरुवारपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला. प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक जी के दास म्हणाले, पश्चिम बंगाल मधील पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे आणि उत्तर २४ परगणा, हावडा आणि हुगली जिल्ह्यांच्या काही भागात पाऊस होईल.