मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं उघडण्याच्या आंदोलनांवरुन विरोधी पक्षांना सुनावलं आहे. ते म्हणाले, अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण कोरोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे. असं व्हायला नको.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आज ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी तसंच उपस्थित डॉक्टरांशी संवादही साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातल्या करोना परिस्थितीचा आढावा घेतला आणि जनतेला मार्गदर्शनही केलं. यावेळी त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे. काही जणांना सगळंच उघडण्याची घाई झाली आहे. पण त्या गोष्टी दीर्घकाळ बंद ठेवायला लागू नये म्हणूनच तर आम्ही ते हळूहळू, परिस्थितीचा आढावा घेऊन उघडत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आम्ही राजकारण्यांनीही कोरोना प्रतिबंधाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. जेव्हा आम्ही बाहेर जातो, जनतेत जातो, त्यावेळी आम्हीच जर नियमांचं पालन केलं नाही तर जनतेला काय सांगणार?