मुंबई : विधानसभेच्या पायऱ्यावर बसून म्याव म्याव करत मांजराची नक्कल करत चिडवत होते, ते आज वाघाला बघून लपून बसलेत असल्याची टीका शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांच्यावर केली आहे. संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आहे. सोमवारपासून नितेश राणे अज्ञातवासात आहेत. त्यावरून दीपक केसरकर यांनी टीका केली.
माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले की, विधानसभेच्या पायऱ्यावर बसून म्याव म्याव करत मांजराची नक्कल करत चिडवत होते ते आज लपून बसलेत. वाघाला घाबरून की कोर्टाला घाबरून लपून बसले माहिती नाही. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक पोलिसांना बघून घाबरतात ही वस्तुस्थिती असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले. कोणी गुन्हा केला माहिती नाही, पण जे लपून बसले आहेत ते कायद्यापासून आणि पोलिसांपासून लपून बसलेत असल्याचे त्यांनी म्हटले.
केसरकर यांनी या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. चुकीचं वागत असाल तर कायदा सर्वांसाठी समान आहे. केंद्रीय मंत्री आहात म्हणून मुलाला वाचवणार अशी भूमिका घेत असतील तर उत्तर प्रदेश मधील मंत्र्याच्या पुत्राला वाचवताना काय झालं ते पाहावं, असेही त्यांनी नारायण राणे यांना म्हटले.
नितेश राणे हे सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करून ५ दिवस पोलीस कोठडीत राहिले हे विसरलेत. त्यांना त्यावेळी मिळालेला जामीन हा सशर्त जामीन मिळाला होता अशी आठवणही केसरकर यांनी करून दिली. न्यायालय जामीन देताना खंडणी, हल्ले करण्यासारखे गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहे. त्यांना जामीन देताना विचार करेल अशी अपेक्षाही केसरकर यांनी व्यक्त केली.
संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना अॅड. संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. तर अॅड. राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत ही कायदेतज्ञ टीम सहकार्याला असेल. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत आणि अॅड. भूषण साळवी हे राज्य सरकारतर्फे ते युक्तिवाद करतील. आज दुपारी २.४५ वाजता जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु होईल.
दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून कणकवलीला परतल्यानं चर्चांना आणखी उधाण आलं आहे. सिंधुदुर्गात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष पेटला आहे. कणकवलीत संतोष परब या शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नारायण राणे यांनीच ही शक्यता वर्तवली, तर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणी नितेश राणेंना अटक करण्याची मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचे सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात थेट सामना होत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात सत्ताधारी आघाडी नितेश राणेंना गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. तर राणेंच्या आरोपांनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी या हल्ला प्रकरणातल्या सूत्रधारावर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात मोर्चा काढायचं ठरवल्यानं शिवसेना आणि राणे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.