उत्तर प्रदेशात आज शेवटच्या टप्प्यातील मतदान
लखनऊ : उत्तर प्रदेशात शेवटच्या आणि सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील ५४ जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बसपच्या प्रमुख मायावती यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर अनुप्रिया पटेल, डॉ.संजय निषाद आणि ओमप्रकाश राजभर यांचीही कठीण परीक्षा असेल.
उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात २ कोटी ५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर, सातव्या टप्प्यात ६१३ उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी ७५ महिला उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाने १२ हजारांहून अधिक मतदान केंद्रं आणि २३ हजारांहून अधिक मतदान स्थळं स्थापन केली आहेत. या सर्व जागांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्ला यांनी सांगितलं की, ७ मार्च रोजी नऊ जिल्ह्यांतील ५४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मतदानाच्या ठिकाणी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, पीपीई किट आणि मास्कची व्यवस्था करण्यात आली आहे.
या जिल्ह्यांमध्ये मतदान
यूपी निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात वाराणसी, गाझीपूर, चंदौली, जौनपूर, आझमगड, मऊ, मिर्झापूर, सोनभद्र आणि भदोही या नऊ जिल्ह्यांतील ५४ जागांसाठी मतदान होणार आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सातव्या टप्प्यातील या ५४ जागांपैकी भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष अपना दल (S) आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष यांना एकूण ३६ जागा मिळाल्या होत्या. या दरम्यान भाजपला २९, अपना दल (एस) चार आणि सुभासपाला तीन जागा मिळाल्या. तर समाजवादी पक्षाला ११, बहुजन समाज पक्षाला सहा आणि निषाद पक्षाला एक जागा मिळाली होती. यावेळी सुभासपा सपा तर निषाद पक्ष भाजपसोबत आहे.
उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपच्या अनेक मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. योगी कॅबिनेटमधील मंत्री अनिल राजभर (शिवपूर), रवींद्र जैस्वाल (वाराणसी उत्तर), नीलकंठ तिवारी (वाराणसी दक्षिण), गिरीश यादव (जौनपूर सदर), रमाशंकर सिंग पटेल (मदिहान), संगीता यादव बलवंत (गाझीपूर सदर) आणि राज्यमंत्री संजीव गोंड (ओब्रा सीट) येथून निवडणुकीच्या मैदानात आहेत.
याशिवाय सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओम प्रकाश राजभर (जहुराबाद जागा), बाहुबली धनंजय सिंग (मल्हानी सीट), मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी (मऊ सदर), अलका राय (मोहम्मदाबाद), पारसनाथ यादव यांचा मुलगा लकी यादव (मल्हानी सीट) यांचा समावेश आहे. बाहुबली ब्रिजेश सिंह यांचा पुतण्या सुशील सिंग (सैयदराजा सीट) आणि आग्रा तुरुंगात बंदिस्त बाहुबली विजय मिश्रा (ग्यानपूर विधानसभा सीट) यांचं भवितव्य पणाला लागलं आहे.