कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. या जागेसाठी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. या विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी आपल्या समर्थकांसह प्रचारासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. तर भाजपचे तब्बल ८० नेते पक्षाच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांच्या प्रचारासाठी ८० ठिकाणी मैदानात उतरणार आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, प्रदेश भाजप प्रमुख सुकांता मजुमदार, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाच्या नेत्या देबश्री चौधरी हे देखील मैदानात उतरणार आहेत.
याशिवाय अर्जुन सिंह आणि स्वप्न दासगुप्ता यांचाही यात सहभाग आहे. येथे ३० सप्टेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०११ आणि २०१६ मध्ये येथूनच निवडणूक जिंकली होती. भवानीपूर मतदार संघ हा ममता बॅनर्जींचा जुनाच मतदारसंघ आहे.
याचवर्षी एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढली होती. यासाठी त्यांनी आपला पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडला होता. मात्र, नंदीग्राममध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. येथे सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला. यापूर्वी सुवेंदू अधिकारी तृणमूलमध्येच होते.
दरम्यान, ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक आहे. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत होऊन मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांना ५ नोव्हेंबरपर्यंत आमदार होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्या निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, यावर पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.